मुंबई । मागील वर्षी झालेल्या रणजी चषकातील उपविजेता बंगाल संघाला पुरस्काराची रक्कम अद्याप देण्यात आली नाही. बंगाल संघातील खेळाडू मनोज तिवारीनी या पुरस्काराची रक्कम न मिळाल्याने क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालकडे (कॅब) नाराजी व्यक्त करत या पुरस्कार रक्कमेबाबत विचारणा केली.
क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालने सर्व खेळाडूंना आश्वासन दिले की, बीसीसीआयकडून एक आठवड्याच्या आत रणजी ट्रॉफी मधील पुरस्काराची मिळालेली एक कोटीची रक्कम मिळवून देण्यात येईल.
बंगाल संघाचा माजी कर्णधार आणि भारताचा फलंदाज मनोज तिवारीनी गुरुवारी झालेल्या ऑनलाइन बैठकीत हा प्रश्न उपस्थित केला. या बैठकीसाठी मुख्य प्रशिक्षक अरुण लाल त्याचबरोबर सर्व सहकारी स्टाफ आणि सदस्य उपस्थित होते.
क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे अध्यक्ष अविषेक दालमिया याबाबत माहिती देताना म्हणाले की, “बंगाल क्रिकेट असोसिएशनने बीसीसीआयकडून पुरस्काराची रक्कम मिळवण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. यासाठी बीसीसीआयकडे पत्र व्यवहार केला आहे. या पुरस्काराची रक्कम लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”
मागील वर्षातील रणजी चषक विजेता संघ सौराष्ट्राला बुधवारी दोन कोटी रुपये पुरस्काराची रक्कम प्राप्त झाली आहे. मात्र, उपविजेता बंगाल संघाला एक कोटी रुपयांची रक्कम मिळाली नसल्याने यावर खेळाडूंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता.
बीसीसीआय जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड मानले जाते असे असले तरी पुरस्काराची रक्कम देण्यासाठी इतका कालावधी लागल्याने खेळाडूंमध्ये प्रचंड नाराजी असल्याची चर्चा आहे.
ट्रेंडिंग घडामोडी –
विराटला प्रपोज करणाऱ्या या महिला क्रिकेटपटूला खेळायचंय आरसीबीकडून
“मला पण रोहित शर्मासारखी फलंदाजी करायची आहे”
सौरव गांगुलीच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण; वहिनीचा अहवाल पॉझिटिव्ह