गोवा- नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसीने इंडियन सुपर लीगमध्ये ( आयएसएल) शुक्रवारी माजी विजेत्या बंगलोर एफसीला पराभवाचा धक्का दिला. नॉर्थ ईस्ट युनायटेडचे आव्हान संपुष्टात आले असले तरी त्यांनी हा विजय मिळवून बंगलोरच्या मार्गात मोठा अडथळा निर्माण केला आहे. क्लेईटन सिल्वाने ६६व्या मिनिटाला बंगलोरला आघाडी मिळवून दिली, परंतु त्यानंतर नॉर्थ ईस्ट युनायटेडकडून पलटवार झाला. डेशॉर्न ब्राऊन ( ७४ मि.) व लाल्दानमाविया राल्टे (८० मि.) यांनी गोल करून नॉर्थ ईस्टला विजय मिळवून दिला. १० सामन्यानंतर नॉर्थ ईस्ट युनायटेडने विजयी चव चाखली.
नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसीचे आयएसएलच्या पर्वातील उपांत्य फेरीचे आव्हान संपुष्टात आलेले असले तरी बंगलोर एफसी विरुद्ध त्यांच्याकडून चांगला खेळ पाहायला मिळाला. दुसऱ्याच मिनिटाला त्यांच्या चुकीचा बंगलोरला फायदा झाला असता. सुनील छेत्री व क्लेईटन सिल्वा ही जोडी बॉक्समध्ये घुसली होती. पण, पॅट्रीक फ्लोटमनच्या सुरेख बचावाने बंगलोरचा गोल रोखला. त्यानंतर दोन्ही संघांकडून सावधच खेळ झालेला पाहायला मिळाला. २२ व्या मिनिटाला नॉर्थ ईस्ट युनायटेडने आयती संधी गमावली. इम्रान खान सहज गोल करू शकला असता, परंतु त्याचा हेडर गोलपोस्ट बाहेर गेला.
२७व्या मिनिटाला बंगलोरचा गोलरक्षक लारा शर्मा याने सुरेख बचाव केला. सुहैरने बॉक्सबाहेरून टोलावलेला चेंडू हेर्नान संतानाकडे आला अन् त्याने तो गोलजाळीच्या दिशेने भिरकावला. पण, लाराने डाईव्ह मारून तो अडवला. ३२ व्या मिनिटाला नामग्याल यानं बंगलोरला आघाडी मिळवून दिलीच होती, परंतु अंतिम स्वरूप देण्यात तो चुकला. पहिल्या हाफमध्ये गोलशून्य बरोबरी राहिली. बंगलोरकडून दोन ऑन टार्गेट प्रयत्न झाले अन् ते दोन्ही अडवले गेले.
दुसऱ्या हाफमध्ये नॉर्थ युनायटेडने सुरुवातीपासूनच आक्रमण केले आणि ४७व्या मिनिटाला लारा शर्माने सुरेख बचाव केला. हर्नान संतानाला फ्री किक मिळाली आणि त्यानं मारलेला चेंडू बॉक्सच्या आत सुहैरने डाईव्ह मारून हेडरद्वारे गोलजाळीत पाठवण्याचा प्रयत्न केला, पण लाराने पुन्हा एकदा अप्रतिम बचाव केला. ५६व्या मिनिटाला सुनील छेत्रीने त्याचा क्लास दाखवला. पण, वन ऑन वन प्रयत्नात युनायटेडचा गोलरक्षक मिर्षाद मिचूने बाजी मारली.
६६व्या मिनिटाला बंगलोरने १-० अशी आघाडी घेतली. डाव्या बाजूने आलेल्या क्रॉसवर क्लेईटन सिल्वाने गोल केला. पण, बंगलोरचा हा उत्साह फारकाळ टिकला नाही. ७४ व्या मिनिटाला जो झोहर्लिआनाच्या पासवर डेशॉर्न ब्राऊनने गोल करून युनायटेडला १-१ अशी बरोबरी मिळवून दिली. ६ मिनिटांच्या अंतराने युनायटेडने आघाडी घेतली. ८०व्या मिनिटाला लाल्दानमाविया राल्टेने हा गोल केला. नॉर्थ ईस्ट युनायटेडने २-१ असा विजय मिळवून बंगलोरची पुढची वाटचाल अडचणीची केली.
निकाल – नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसी २ ( डेशॉर्न ब्राऊन ७४ मि., लाल्दानमाविया राल्टे ८० मि.) विजयी विरुद्ध बंगलोर एफसी १ ( क्लेईटन सिल्वा ६६ मि. ).