गोवा (२४ जानेवारी) : हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) साखळी फेरीत मंगळवारी (२५ जानेवारी) तळातील नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसीला हरवून गतविजेता मुंबई सिटी एफसीला आठव्या हंगामात गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या केरला ब्लास्टर्स एफसीला गाठण्याची संधी आहे.
फातोर्डा येथील पीजेएन स्टेडियमवर रंगणाऱ्या लढतीत मुंबई सिटीला टॉपला जाण्यासह पाच विनलेस सामन्यांची मालिका खंडित करण्याला वाव आहे. दुसऱ्या टप्प्यात कामगिरी खालावल्याने गतविजेत्यांना पॉइंट्स टेबलमधील पहिले स्थान गमवावे लागले. ११ सामन्यांतून १७ गुण खात्यात असलेला मुंबई सिटी हा हैदराबाद एफसीसह संयुक्तरित्या पाचव्या स्थानी आहे. नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसीला हरवल्यास ३ गुणांसह ते थेट पहिल्या स्थानावर असलेल्या केरला ब्लास्टर्सला आव्हान देऊ शकतील. केरला ब्लास्टर्सचे ११ सामन्यांतून २० गुण आहेत.
आयएसएलमध्ये सहभागी ११ क्लब्जमध्ये नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसी शेवटच्या स्थानी आहे. १३ सामन्यांत ९ गुण मिळवणाऱ्या या क्लबला केवळ २ विजय मिळवता आलेत. तुलनेत कमकुवत प्रतिस्पर्धी असला तरी मुंबई सिटीला मागील पाच लढतींमध्ये विजय मिळवता आलेला नाही. नॉर्थ ईस्ट युनायटेडचाही नन्नाचा पाढा कायम आहे. मागील सहा सामन्यांत चार पराभव पाहावे लागलेत. मुंबई सिटी एफसीचा बचाव अधिक भक्कम व्हावा, असे मुख्य प्रशिक्षक डेस बकिंगहॅम यांना वाटते. गेल्या पाच सामन्यांत त्यांनी १३ गोल खाल्लेत. मुंबई सिटीच्या तुलनेत नॉर्थ ईस्टची गोल कन्सिड करण्याची संख्या कमी आहे. त्यांनी मागील ६ सामन्यांत सहा गोल खाल्लेत.
मागच्या पाच सामन्यांत आम्हाला विजय मिळाला नसला तरी सांघिक कामगिरी वाईट झाली, असे म्हणता येणार नाही. आम्हाला अनेक संधींचे गोलांमध्ये रूपांतर करता आलेले नाही. मात्र, यंदाच्या हंगामातील आणखी ९ सामने शिल्लक आहेत. दुसऱ्या टप्प्यात खेळ उंचावून आम्ही जेतेपद राखण्याचा प्रयत्न करू, असे मुंबई सिटीचे मुख्य प्रशिक्षक बकिंगहॅम यांनी म्हटले आहे.
नॉर्थ ईस्ट युनायटेडला मागील लढतीत चेन्नईयन एफसीविरुद्ध १-२ असा पराभव पाहावा लागला तरी त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना चांगले झुंजवले. मात्र, आघाडीचे रूपांतर विजयात करता आली नसल्याची खंत मुख्य प्रशिक्षक खालीद जमील यांनी व्यक्त केली आहे. केवळ चेन्नईयन नव्हे तर मागील सहापैकी पाच सामन्यांत नॉर्थ ईस्ट युनायटेडला संधीचे विजयात रूपांतर करता आलेले नाही.
आठव्या हंगामात मुंबई सिटी एफसी आणि नॉर्थ ईस्ट युनायटेड यांच्यातील पहिल्या टप्प्यातील सामन्यात नॉर्थ ईस्ट युनायटेडने गतविजेत्यांना चांगलेच झुंजवताना ३-३ अशी बरोबरी साधली. त्यावेळच्या चुका न टाळल्या तर मुंबई सिटी एफसीसमोरील आव्हान तितके सोपे नसेल.