हैदराबाद। पुरुष एकेरीच्या सामन्यात नॉर्थ ईस्टर्न वॉरियर्सच्या कौशल धर्मानेरसमोर चेन्नई सुपरस्टार्जच्या के. सतिश कुमारचे आव्हान हेते. कौशल धर्मानेरने सामन्याच्या सुरुवातीपासूनच जोरदार खेळ करत पहिला 15-3 असा सहज जिंकला. यानंतरच्या गेममध्ये सतिश कुमारने आव्हान दिले पण, धर्मानेरने आपला फॉर्म कायम ठेवत गेम 15-11 असा आपल्या नावे करत विजय मिळवला.
पुरुष दुहेरीत चेन्नई सुपरस्टार्जच्या बी सुमित रेड्डी व ध्रुव कपिला जोडीने बोदीन इसारा व कृष्णा प्रसाद गारगा जोडीला 2-0 अशा फरकाने नमविले. रेड्डी व कपिला जोडीने पहिला गेम 15-13 असा आपल्या नावे केला. दुसरा गेममध्ये त्यांना प्रतिस्पर्धी जोडीकडून आव्हान मिळाले पण, त्यांनी गेम 15-14 असा आपल्या नावे करत विजय मिळवत सामना बरोबरीत आणला.
महिला एकेरीच्या कर्स्टी गिलमौर या चेन्नई सुपरस्टार्जच्या खेळाडूने अस्मिता चलिहाला पहिल्या गेममध्ये 15-12 असे नमविले. दुस-या गेममध्ये देखील तिने आपला हाच फॉर्म कायम ठेवत 15-11 अशी चमक दाखवत सामन्यात विजय मिळवला. हा ट्रम्प सामना असल्याने चेन्नई सुपरस्टार्ज संघाने 3-1 अशी आघाडी घेतली.
नॉर्थ ईस्टर्न वॉरियर्स संघासाठी पुरुष एकेरीचा सामना अत्यंत महत्वाचा होता. त्यांच्या ली चेऊक यिऊने संकर मुथुस्वामीला नमविले. पहिला गेम 15-8 असा जिंकल्यानंतर यिऊने दुसरा गेम 15-11 असा आपल्या नावे करत विजय मिळवला. हा ट्रम्प सामना असल्याने नॉर्थ ईस्टर्न वॉरियर्स संघाने 3-3 अशी बरोबरी साधली.
मिश्र दुहेरीच्या निर्णायक सामन्यात नॉर्थ ईस्टर्न वॉरियर्सच्या ली योंग डाए व किम हा ना जोडीने चेन्नई सुपरस्टार्जच्या ध्रुव कपिला व संजना संतोष जोडीला 2-0 अशा फरकाने पराभूत केले. डाए व किम जोडीने पहिला गेम 15-11 असा आपल्या नावे करत आघाडी घेतली. दुस-या गेममध्ये डाए व किम जोडीने 15-9 अशी बाजी मारत सामन्यात विजय मिळवला.