गोवा| हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमात शनिवारी नॉर्थईस्ट युनायटेडने मुंबई सिटी एफसीला २-० असे हरविले. जमैकाचा स्ट्रायकर देशोर्न ब्राऊन याने दोन्ही गोल केले. या पराभवामुळे मुंबई सिटीला मोसमाच्या प्रारंभी झालेल्या लढतीमधील पराभवाची परतफेड करण्यात अपयश आले.
सलामीच्या लढतीत नॉर्थईस्ट युनायटेडनेच मुंबई सिटीला १-० असे गारद केले होते. नॉर्थईस्ट युनायटेडकडून हरल्यानंतर मुंबई सिटीने १२ सामन्यांत अपराजित मालिका राखली होती. ती अखेर संपुष्टात आली. तो विजय नशिबाचा भाग नसल्याचे नॉर्थईस्ट युनायटेडने सिद्ध केले.
बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर हा सामना झाला. नॉर्थईस्ट युनायटेडने सनसनाटी प्रारंभ केला. पहिल्या नऊ मिनिटांत त्यांच्याकडे दोन गोलांची आघाडी जमली. आघाडी फळीतील जमैकाचा ३० वर्षीय खेळाडू ब्राऊन याने हा पराक्रम केला. मुंबईची गोलची प्रतिक्षा पाच मिनिटे बाकी असताना आघाडी फळीतील इंग्लंडचा ३४ वर्षीय बदली खेळाडू अॅडम ली फाँड्रे याने संपुष्टात आणली. त्यानंतर मात्र मुंबई सिटीला आणखी यश मिळाले नाही.
या पराभवानंतरही मुंबई सिटीची आघाडी कायम राहिली. १४ सामन्यांत त्यांना दुसरीच हार पत्करावी लागली असून नऊ विजय व तीन बरोबरी अशा कामगिरीसह त्यांचे ३० गुण आहेत.
नॉर्थईस्ट युनायटेडने या विजयासह चौथ्या क्रमांकावर झेप घेतली. त्यांनी हैदराबाद एफसील मागे टाकले. नॉर्थईस्ट युनायटेडने १४ सामन्यांत पाचवा विजय नोंदविला असून सहा बरोबरी व तीन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे २१ गुण झाले. त्यांनी तिसऱ्या क्रमांकावरील एफसी गोवा संघाला गुणांवर गाठले आहे, मात्र गोव्याचा ५ (१९-१४) गोलफरक नॉर्थईस्टच्या १ (१९-१८) पेक्षा सरस आहे. हैदराबादचे १४ सामन्यांतून १९ गुण आहेत.
एटीके मोहन बागान १३ सामन्यांतून २४ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. सात विजय, तीन बरोबरी व तीन पराभव अशी त्यांची कामगिरी आहे.
नॉर्थईस्ट युनायटेडने दमदार प्रारंभ केला. सहाव्याच मिनिटाला आघाडी फळीतील लुईस मॅचादोने पेनल्टी क्षेत्राच्या बाहेरून नेटच्या दिशेने फटका मारला. मुंबई सिटीचा गोलरक्षक अमरींदर सिंग याने डावीकडे झेपावत चेंडू थोपविला, पण हा चेंडू बॉक्सलगतच असलेला नॉर्थईस्ट युनायटेडचा स्ट्रायकर सुहैर वाडाक्केपीडीका याच्या दिशेने गेला. त्यावेळी डावीकडे असलेल्या सुहैरने शांतचित्ताने मैदानावरील स्थितीचा अंदाज घेतला आणि बचाव फळीतील नीम दोर्जी याच्याकडून त्याला साथ मिळाली. मग नीमच्या पासवर ब्राऊनने फिनिशींग केले.
तीन मिनिटांनी नॉर्थईस्ट युनायटेडने कॉर्नरवर दुसरा गोल केला. याचा मानकरी ब्राऊन हाच होता. उजवीकडे मिळालेला कॉर्नर मध्यरक्षक फेडेरीको गॅलेगो याने घेतला. त्यावेळी मुंबई सिटीचा मध्यरक्षक हर्नान सँटाना याने हेडिंगद्वारे केलेला बचाव कमकुवत होता. त्यामुळे चेंडू त्याच्या मागेच असलेल्या मॅचादोच्या दिशेने गेला. मॅचादोने मग निर्माण केलेल्या संधीचे ब्राऊनने गोलमध्ये रुपांतर केले. त्याने मांडीने चेंडूला नेटची दिशा दिली. मध्यंतरास नॉर्थईस्ट युनायटेडकडे दोन गोलांची आघाडी होती.
मुंबई सिटीला अखेर अंतिम टप्प्यात दिलासा मिळाला. ८५व्या मिनिटाला ओगबेचे याने रचलेल्या चालीवर बदली स्ट्रायकर अॅडमने फिनिशींग केले. त्याचा हा मोसमातील सातवा गोल आहे.
पहिल्या सत्रात ब्राऊनला २०व्या मिनिटाला हॅट््ट्रिकची सुवर्णसंधी होती. बचावपटू प्रोवात लाक्रा याने मध्य क्षेत्रात डावीकडून चाल रचली. त्याने क्रॉस पास दिला तेव्हा ब्राऊनचे पेनल्टी क्षेत्रात मार्किंग करण्यात मुंबई सिटीच्या खेळाडूंचे दुर्लक्ष झाले होते. ब्राऊनने फठका मारला, पण चेंडू गोलरक्षक अमरींदर याच्या डावीकडून बाहेर गेला.
पहिल्या सत्रात ३०व्या मिनिटाला मुंबई सिटीला मिळालेला कॉर्नर मध्यरक्षक बिपीन सिंगने घेतला. त्यावर स्ट्रायकर बार्थोलोम्यू ओगबेचे याने हेडिंग केले, पण त्यात अचूकता नव्हती.
४१व्या मिनिटाला मुंबई सिटीचा मध्यरक्षक जॅकीचंद सिंग याने मध्य फळीतील सहकारी ह्युगो बुमूस याला उजवीकडे पास दिला. मग बुमूसने बचावपटू अमेय रानवडेला संधी दिली. त्यातून बॉक्सलगत अहमद जाहु याला चेंडू मिळाला. नॉर्थईस्ट युनायटेडचा गोलरक्षक शुभाशिष रॉय याने त्याचा फटका डावीकडे झेपावत थोपविला. रिबाऊंडवर जॅकीचंदला चेंडू मिळाला. त्याने फटका मारला, पण नॉर्थईस्टचा बचावपटू प्रोवात लाक्रा याने तो बाहेर घालविला.
संबधित बातम्या:
आयएसएल २०२०-२१ : नाट्यमय लढतीत गोवा-ईस्ट बंगाल बरोबरी
आयएसएल २०२०-२१ : हैदराबादची अखेरच्या पाच मिनिटांत बेंगळुरूविरुद्ध बरोबरी
आयएसएल २०२०-२१ : ब्लास्टर्सची जमशेदपूरची गोलशून्य बरोबरी