ईशान्येमध्ये फुटबॉल हा केवळ एक खेळच नव्हे तर जीवनशैली आहे. देशाच्या अतीपूर्वेकडील परिसरातील आठ राज्यांनी मिळून निर्विवादपणे असंख्य फुटबॉलपटू घडविले आहेत. या परिसरामधील फुटबॉलपटू नसलेला एकही क्लब मिळणे अवघड आहे.
हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) या परिसराचे प्रतिनिधीत्व करणारा संघ नॉर्थईस्ट युनायटेड एफसी आहे. पहाडी भागातील हा क्लब हायलँडर्स या टोपणनावाने लोकप्रिय आहे. येथील पारंपरीक फुटबॉलप्रेम या क्लबने आणखी उच्च पातळीवर नेले आहे. प्रारंभ झाल्यापासून पाच वर्षांत नॉर्थईस्टने समर्थकांचा एक भक्कम वर्ग निर्माण केला आहे, जो कामगिरीत चढ-उतार आले तरी क्लबबरोबर कायम आहे.
2014 मधील पहिल्या मोसमात नॉर्थइस्टला चांगली सुरवात करता आली नाही. ते केवळ तीन सामने जिंकू शकले. पुढील तीन मोसमांत त्यांना प्ले-ऑफसाठी पात्र ठरता आले नाही. असे प्रतिकूल निकाल लागूनही येथील फुटबॉल समुदायाने आपल्या संघाची साथ कधीही सोडली नाही. या क्लबने चाहत्यांशी नाते निर्माण करण्यात यश मिळविले आहे. गेल्या मोसमात निकाल निराशाजनक लागूनही क्लबला प्रोत्साहन देण्यासाठी आलेल्या चाहत्यांच्या मोठ्या संख्येवरून हे स्पष्ट झाले.
क्लबचे मालक व अभिनेते जॉन अब्राहम यांनी सांगितले की, नॉर्थईस्ट हा भारतामध्ये फुटबॉल समजणारा भाग असल्याचे मला नेहमीच वाटते. खेळावरील त्यांची निष्ठा अतुलनीय आहे.
वाजवी यशासाठी या चाहत्यांना पाच वर्षे प्रतिक्षा करावी लागली. आता केरला ब्लास्टर्स एफसीकडे वळलेले नेदरलँड््सच्या एल्को शात्तोरी यांच्या मार्गदर्शनाखाली क्लब इतिहासात प्रथमच बाद फेरी गाठली. काही खेळाडूंना दुखापती झाल्या नसत्या तर या क्लबने अंतिम फेरी नक्कीच गाठली असती.
कट्टर चाहत्यांबद्दल विचाराल तर त्यांचा ओघ कायम आहे. गुवाहाटीमधील इंदिरा गांधी अॅथलेटीक स्टेडियमवर गेल्या मोसमात घरच्या मैदानावरील सामन्यांसाठी सरासरी 13 हजार 458 प्रेक्षक उपस्थित होते. बेंगलोर एफसीविरुद्ध उपांत्य फेरीतील पहिल्या टप्यात त्यांची लढत झाली. तो गतमोसमात घरच्या मैदानावरील शेवटचा सामना होता. त्यावेळी 21 हजार 786 प्रेक्षक संघाला भरभरून पाठिंबा देण्यात उपस्थित होते.
येथेच भारताचा ओमानविरुद्ध 2011 विश्वकरंडक पात्रता सामना झाला. त्यावेळी 22 हजार 788 प्रेक्षक उपस्थि होते. त्यावरून गुवाहाटीतील प्रेक्षकांची फुटबॉलवरील निष्ठा अधोरेखित झाली.
या परिसरात फुटबॉल नेहमीच लोकप्रिय राहिला आहे आणि आता पाठिंबा द्यायला त्यांना क्लब मिळाला होता. या क्लबने स्थानिक गुणवत्तेला नेहमीच पाठिंबा दिला आहे आणि त्यामुळे त्यांची चाहत्यांशी नाळ जुडली आहे. नॉर्थईस्टमधील बहुतेक भारतीय फुटबॉलपटू या भागातील आहेत आणि या क्लबने नामांकित फुटबॉलपटूंच्या करारारवर गुंतवणूक केली आहे.
हिरो आयएसएलच्या या मोसमातील सर्वांत मातब्बर फुटबॉलपटू नॉर्थईस्टकडे आहे. संडरलँड आणि घानाचा माजी स्ट्रायकर असोमोह ग्यान असे त्याचे नाव आहे. आठ राज्यांमधील फुटबॉलप्रेमींना आता नव्या मोसमाची प्रतिक्षा आहे. क्रोएशियाचे मुख्य प्रशिक्षक रॉबर्ट जार्नी यांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी होणाऱ्या या संघाकडून वाढत्या अपेक्षा असतील.