दक्षिण आफ्रिका आणि मुंबई इंडियन्सचे माजी मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचर यांनी आयपीएल 2025 चा सर्वोत्तम विकेटकीपर फलंदाज म्हणून एमएस धोनी किंवा पंत नव्हे तर एक वेगळ्याच भारतीय खेळाडूचे नाव घेतले आहे. त्यांचा असा विश्वास आहे की हा स्टार खेळाडू राष्ट्रीय टी-20 संघात स्थान मिळविण्याचा दावेदार आहे. खरं तर, हे नाव दुसरे तिसरे कोणी नसून दिल्ली कॅपिटल्सकडून हंगाम खेळणारा केएल राहुल आहे. राहुल दिल्ली कॅपिटल्सकडून दमदार कामगिरी करत आहे आणि आतापर्यंतच्या अनेक विजयांमध्ये त्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
केएल राहुलने त्याच्या नवीन फ्रँचायझी दिल्ली कॅपिटल्ससाठी मधल्या फळीत फलंदाजी करताना 4 सामन्यांमध्ये 66.66 च्या शानदार सरासरीने आणि 163.93 च्या स्ट्राईक रेटने 200 धावा केल्या आहेत. ‘जियोस्टार’चे एक्सपर्ट बाउचर यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, ‘जर तुम्ही आयपीएल पाहिले तर तो एक खेळाडू आहे ज्याने विकेटकीपिंग आणि फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली आहे. तो लोकेश राहुल आहे. मी येथे एमएस धोनीबद्दल बोलत नाही कारण आपण भविष्याबद्दल बोलत आहोत.’
बाउचर म्हणाले, ‘त्याने काही शानदार खेळी खेळल्या. एका सामन्यानंतर त्याने असेच काहीसे सांगितले, ज्याच्याशी मी सहमत आहे. तो म्हणाला की जेव्हा तो विकेटकीपिंग करतो तेव्हा त्याला बरीच माहिती मिळते जी तो त्याच्या फलंदाजीत वापरू शकतो. तो आयपीएलमधील सर्वोत्तम विकेटकीपर फलंदाजांपैकी एक आहे.’ दक्षिण आफ्रिकेसाठी 147 कसोटी, 295 एकदिवसीय आणि 25 टी-20 सामने खेळणाऱ्या 48 वर्षीय माजी खेळाडूने ध्रुव जुरेल आणि ऋषभ पंत यांच्याबद्दलही विधान केले. यापूर्वी, मुख्य प्रशिक्षक म्हणाले, ‘ध्रुव जुरेल देखील एक हुशार खेळाडू आहे. ऋषभ पंत अधिकाधिक चांगला होत चालला आहे. त्याने काल रात्री चांगले विकेट ठेवले. भारतात तुमच्याकडे अनेक पर्याय आहेत.’