क्रिकेटच्या मैदानावर एखाद्या खेळाडूचा मृत्यू होणे ही घटना अगदी कमी वेळा घडते. ज्या वयामध्ये क्रिकेटपटू आपली कारकीर्द घडवण्यासाठी मेहनत घेत असतात त्याचवेळी काही खेळाडूंना हे जग सोडून जावे लागते. इंग्लंडमधील प्रसिद्ध काउंटी क्लब नॉटिंघमशायरचा युवा क्रिकेटपटू जोशुआ डाऊनी याचे वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी निधन झाले. जोशुआच्या निधनामुळे इंग्लंड क्रिकेटमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
अशी घडली घटना
नॉटिंघमशायरच्या संघाचा भाग असलेला जोशुआ डाऊनी आपल्या संघ सहकाऱ्यांसह बिर्केनहेड येथे सराव करत होता. या दरम्यान अचानकपणे त्याला हृदयविकाराचा झटका आला. सुरुवातीस सहकाऱ्यांना ही भोवळ असल्याचे वाटले मात्र, दवाखान्यात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोस्टमार्टमनंतर त्याचा मृत्यू हृदयविकारामुळे झाल्याचे निदान केले गेले. जोशुआ हा क्रिकेटरसोबत शिक्षक देखील होता. त्याने आपले शिक्षण लिव्हरपूल येथे पूर्ण केलेले.
खेळांचा आहे वारसा
जोशुआ डाऊनी याच्या घरात खेळांचा वारसा होता. बहिण बेकी डाऊनी ही आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिकमध्ये इंग्लंडच्या संघाचा भाग आहे. बेकी हिने दोन ऑलम्पिकमध्ये इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले होते. जोशुआची लहान बहीण एली हीदेखील जिम्नॅस्ट आहे.
नॉटिंघमशायरने व्यक्त केला शोक
क्रिकेटमध्ये जोशुआ डाऊनी प्रतिनिधित्व करत असलेल्या नॉटिंघमशायरने त्याच्या मृत्यूनंतर एक निवेदन सार्वजनिक केले आहे. यामध्ये लिहिले आहे, ‘अवघ्या २४ वर्षाच्या एका उमद्या क्रिकेटपटूच्या जाण्याने आम्हाला मोठे दुःख झाले आहे. आमचा सर्व नॉटिंघमशायर संघ दुःखी असून या कठीण काळात आमच्या संवेदना त्याच्या कुटुंबासोबत आहेत.’
जोशुआने हकनेल क्रिकेट क्लब, फिकर्टन सीसी व बर्टन जॉयस एकादश या संघांचे प्रतिनिधित्व केले होते. १३७ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
श्रीलंका दौऱ्यासाठी धवन किंवा भुवनेश्वर होतील कर्णधार, माजी भारतीय खेळाडूचे वक्तव्य
उर्वरित आयपीएल होणार इंग्लंडच्या खेळाडूंविना? हे आहे कारण