भारताने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली 2011 चा विश्वचषक जिंकला. 2 एप्रिल रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्धच्या त्या अंतिम सामन्यात धोनीने षटकार मारला आणि भारताने तो सामना सहा विकेट्सने जिंकला. त्यामुळे भारत 28 वर्षांनंतर पुन्हा एकदा विश्वविजेता बनला. धोनीने ज्या गोलंदाजाच्या चेंडूवर तो अविस्मरणीय षटकार मारला होता, आता त्याने काही धक्कादायक विधाने केली आहेत.
धोनीने तो षटकार वेगवान गोलंदाज नुवान कुलसेकराच्या गोलंदाजीवर मारला होता. लॉंग-ऑफवरून मारलेला तो षटकार आजही भारतीय क्रिकेट रसिकांच्या आवडत्या क्षणांपैकी एक आहे, मात्र त्या षटकारामुळे कुलसेकरा खूप दु:खी झाला होता. तरीही त्याने धोनीचे वर्णन ‘एक उत्तम व्यक्तिमत्व’ असे केले आहे.
कुलसेकरा आयपीएलमध्ये धोनीसोबत खेळला. त्याने वनडे विश्वचषक झाल्यानंतर 2011 मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून एक आणि 2012 च्या हंगामात पाच सामने खेळले. आता त्याने धोनीबद्दल म्हटले की सीएसकेसोबत असताना धोनीने कधीही त्या विश्वचषकातील षटकाराचा किंवा सामन्याचा उल्लेख केला नाही.
“2011 च्या विश्वचषकानंतर मी लगेचच चेन्नई सुपर किंग्जमध्ये सामील झालो, पण धोनीने त्या अंतिम सामन्याबद्दल कधीच काही भाष्य केले नाही; यावरून तो किती शांत आणि नेहमी वर्तमानावर लक्ष केंद्रित करणारा व्यक्ती आहे, हे दिसून येते. हीच गोष्ट मला त्याच्याबद्दल खूप आवडली,” असे कुलसेकराने नुकतेच माध्यामांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
कुलसेकराला एका चुकीचा पश्चाताप
कुलसेकराने 2011च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात एक चूक केली होती, ज्याचा त्याला आजही पश्चाताप होत आहे. त्याने गौतम गंभीरचा झेल सोडला होता.
त्या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या गंभीरने 97 धावाची शानदार खेळी केली होती. वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर झटपट बाद झाल्यानंतर गंभीरने जबाबदारी घेतली. गंभीर त्यावेळी 30 धावांवर होता आणि त्याने लॉंग-ऑफवर मारलेला चेंडूचा झेल कुलसेकराने सोडला आणि पुढे जे झाले, त्यामुळे श्रीलंकेने सामना गमावला.
गंभीरने विराट कोहलीसोबत तिसऱ्या विकेटसाठी 83 धावांची आणि धोनीसोबत चौथ्या विकेटसाठी 109 धावांची भागीदारी केली होती. यामध्ये गंभीरचा झेल सोडल्याचा आजही कुलसेकराला पश्चाताप होत आहे. तो म्हणाला, एका क्षणी मला खात्री होती की, आम्ही सामना जिंकू शकतो. गंभीरचा मी सोडलेला झेल, त्याचा मला पश्चाताप आहे, मात्र मोठ्या सामन्यात अशा घटना घडतात.
सध्या कुलसेकरा ‘लंका प्रीमियर लीग’ (LPL) मधील ‘कोलंबो कॅप्स’ या संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक आहे.






