न्यूझीलंड आणि नेदरलँड्स (NZ vs NED ODI Series) या दोन संघात सध्या तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. एकदिवसीय मालिकेचा दुसरा सामना २ एप्रिलला हेमिल्टनमध्ये खेळला गेला आणि न्यूझीलंडने यामध्ये ११८ धावांनी मोठा विजय मिळवला. न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने या सामन्यात भारताचा महान फलंदाज सचिन तेंडूलकरला मागे टाकत एका विक्रमाची नोंद केली आहे.
नेदरलँड्सविरुद्धचा हा दुसरा एकदिवसीय सामना शनिवारी (२ एप्रिल) खेळला गेला. न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथम (Tom Latham) याच्यासाठी हा दिवस खास ठरला, कारण २ एप्रिलला त्याचा वाढदिवस असतो आणि या खास दिवशी लॅथमच्या नावावर एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली. लॅथमने त्याच्या ३० व्या वाढदिवशी सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे. लॅथम आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी सर्वात मोठी खेळी करणारा फलंदाज बनला आहे.
लॅथमने या सामन्यात १२३ चेंडूत १४० धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून १० चौकार आणि ५ षटकार निघाले. स्वतःच्या वाढदिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळी करणाऱ्यांच्या यादीत यापूर्वी पहिल्या क्रमांकावर महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) होता. परंतु, आता ही जागा टॉम लॅथमने मिळवली आहे.
सचिनने २४ वर्षांपूर्वी म्हणजेच १९९८ साली शारजाहमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना त्याच्या वाढदिवशी १३४ धावांची खेळी केली होती आणि या यादीत पहिला क्रमांक पटकावला होता. आता लॅथमने १४० धावांच्या खेळीसह सचिनला मागे टाकले आहे.
Captain Tom Latham brings up his sixth ODI century 👏
Watch all the #NZvNED action live and FREE on https://t.co/MHHfZPyHf9 (in select regions) 📺 pic.twitter.com/8p3rMD37ve
— ICC (@ICC) April 2, 2022
न्यूझीलंड आणि नेदरलँड्स संघामधील या सामन्याचा विचार केला, तर नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले होते. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ९ विकेट्सच्या नुकसानावर २६४ धावा केल्या. प्रत्युत्तरात नेदरलँड्सचा संपूर्ण संघ ३४.१ षटकात १४६ धावा करून सर्वबाद झाला. टॉम लॅथमलला त्याच्या अप्रतिम फलंदाजीसाठी सामनावीर पुरस्काराने सन्मानित केले गेले. लॅथमच्या एकदिवसीय क्रिकेटमधील ही सर्वात मोठी खेळी ठरली आहे.