न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघ बुधवारी (दि. 01 नोव्हेंबर) पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडिअममध्ये आमने-सामने होते. हा विश्वचषक 2023 स्पर्धेतील 32वा सामना होता. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 190 धावांनी दणदणीत विजय साकारला. हा आफ्रिकेचा 6वा विजय ठरला. या विजयानंतर कर्णधार टेम्बा बावुमाची प्रतिक्रिया सर्वांचे लक्ष वेधत आहे. चला तर, काय म्हणालाय बावुमा जाणून घेऊयात…
या सामन्यात न्यूझीलंड (New Zealand) संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी दक्षिण आफ्रिका (South Africa) संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 4 विकेट्स गमावत 357 धावांचा भलामोठा डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाचा डाव 35.3 षटकात 167 धावांवरच पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळला. अशाप्रकारे दक्षिण आफ्रिकेला 190 धावांनी विजय मिळाला.
बावुमाचे विधान
विजयानंतर टेम्बा बावुमा (Temba Bavuma) खूपच खुश झाला. त्याने म्हटले की, संघाने चेंडू आणि बॅटमधून जबरदस्त प्रदर्शन केले. बावुमाने क्विंटन डी कॉक (114) आणि रासी व्हॅन डर ड्युसेन (133) यांचेही कौतुक केले. तो म्हणाला, हे दोघे उशीरपर्यंत टिकले, ज्यामुळे संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात मदत मिळाली. नंतर गोलंदाजांनी काम पूर्ण केले.
बावुमा म्हणाला की, “डी कॉक आणि रासीमध्ये चांगली भागीदारी झाली होती. बॅटमधून आम्ही शानदार प्रदर्शन केले आणि जेव्हा नवीन चेंडू उडत होता, तेव्हा आमच्या फलंदाजांनी त्याला सांभाळले. नंतर आम्ही चेंडूतूनही दबाव बनवला. आम्ही खराब चेंडूंवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. डी कॉकने सावकाश सुरुवात केली होती, पण तो उशीरपर्यंत टिकून राहिला. अखेरीस आक्रमकतेसोबत याचा फायदा उचलला. आम्हाला पहिल्या 30 षटकांपर्यंत टिच्चून खेळायचे होते, जेणेकरून अखेरच्या 20 षटकात मोठी धावसंख्या उभारता येईल. आम्हाला नेहमीच नवीन चेंडू आणि नंतर मधल्या षटकात चेंडूने दबाव बनवायचा आहे.”
दक्षिण आफ्रिकेचा खास पराक्रम
खरं तर, वनडे विश्वचषकात हा न्यूझीलंडचा दुसरा सर्वात मोठा पराभव आहे. यावर्षी दक्षिण आफ्रिकेची 100हून अधिक धावांनी विजय मिळवण्याची 9वी वेळ आहे. हा एका कॅलेंडर वर्षातील विश्वविक्रम आहे. मागील 8 सामन्यात जेव्हाही दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी केली आहे, त्यांनी कमीत कमी 100 धावांनी विजय मिळवला आहे. हा एक विश्वविक्रम आहे. (nz vs sa world cup 2023 Skipper temba bavuma statement after win the match against new zealand)
हेही वाचा-
ग्लेन फिलिप्सची एकाकी झुंज अपयशी! दक्षिण आफ्रिकेची गुणतालिकेतील झेप विजयापेक्षाही मोठी
विश्वचषकादरम्यान वानखेडेत मास्टर ब्लास्टरच्या पुतळ्याचे उद्घाटन, इथेच खेळलेला कारकिर्दीतील अखेरचा सामना