मंगळवारी (10 ऑक्टोबर) वनडे विश्वचषकात इंग्लंड व बांगलादेश संघ आमने-सामने आले. या सामन्यात इंग्लंड प्रथम फलंदाजीसाठी उतरला. इंग्लंड संघासाठी सलामीवीर डेव्हिड मलान याने शानदार झळकावले. यासोबतच जॉनी बेअरस्टो व जो रूट यांनी देखील अर्धशतके ठोकल्याने इंग्लंडने 364 धावा उभारल्या. स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवण्यासाठी बांगलादेशला हे आव्हान पार करावे लागेल.
या सामन्यात प्रथम फलंदाजीची संधी मिळालेल्या इंग्लंडला डेव्हिड मलान व जॉनी बेअरस्टो यांनी 17.5 षटकात 115 धावांची सलामी दिली. बेअरस्टो अर्धशतक करून बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर जो रूट याने देखील त्याचाच कित्ता गिरवला. दोघांनी जोरदार फटकेबाजी करत बांगलादेशच्या गोलंदाजांना दबावात टाकले.
डेविड मलान (Dawid Malan) याने या सामन्यात 107 चेंडूंचा सामना करताना 140 धावांची शतकी खेळी केली. मलानने शतक करताना 5 षटकार आणि 16 चौकारांचाही पाऊस पाडला. हे त्याचे वनडे विश्वचषकातील पहिले आणि वनडे कारकीर्दीतील एकूण 6वे शतक होते. दुसऱ्या बाजूने रूट याने 68 चेंडूंचा सामना करताना 82 धावांची झंझावाती अर्धशतकी खेळी साकारली. त्याच्या खेळीत 1 षटकार आणि 8 चौकारांचा समावेश होता.
हे दोघे बाद झाल्यानंतर इतर फलंदाजांना धावांची विशेष गती राखता आली नाही. बांगलादेशच्या गोलंदाजांनी शानदार पुनरागमन करत इंग्लंडला 364 पर्यंत रोखण्यात यश मिळवले. बांगलादेश संघासाठी शोरीफुल इस्लाम याने सर्वाधिक चार तर मेहदी हसनने तीन बळी मिळवले.
(ODI Cricket World Cup England Post 364 Malan Hits Century)