इंडियन सुपर लीग 2022-23 (आयएसएल) मध्ये ओडिशा एफसीला प्ले ऑफच्या शर्यतीत एक पाऊल पुढे टाकण्याची संधी आहे. ओडिशा एफसी शनिवारी (7 जानेवारी) घरच्या प्रेक्षकांसमोर तालिकेत आठव्या क्रमांकावर असलेल्या ईस्ट बंगाल एफसीचा सामना करणार आहे. ओडिशा एफसी सध्या तालिकेत सहाव्या क्रमांकावर आहे आणि उद्याची लढत जिंकून त्यांना एक स्थान वर सरकण्याची संधी मिळणार आहे. गतविजेत्या हैदराबाद एफसीने मागील सामन्यात एफसी गोवा संघावर विजय मिळवून ओडिशाला ही संधी दिली आहे.
ओडिशाने मागील सामन्यात तगड्या मुंबई सिटी एफसीला कडवी टक्कर दिली, परंतु मुंबईने 4-2 अशा फरकाने ओडिशाचा पराभव केला. मागील चार सामन्यांतील त्यांचा हा तिसरा पराभव ठरला. पण, एफसी गोवाच्या पराभवामुळे ओडिशाला तालिकेत आगेकूच करण्याची संधी मिळाली आहे. दोन्ही संघांच्या खात्यात प्रत्येकी 19 गुण आहेत.
ओडिशाने मागील चार सामन्यांत 8 गोल विरोधात खाल्ले आहेत अन् केवळ दोन गोल केलेत तेही मुंबई सिटीविरुद्धच्या सामन्यात. डिएगो मॉरिसिओ आणि नंदाकुमार सेकर यांची कामगिरी ही ओडिशासाठी सर्वात मोठी सकारात्मक गोष्ट आहे. त्यांनी पाच गोल केले आहेत आणि तीन गोलसाठी सहाय्य केलं आहे. ओडिशा एफसीचे मुख्य प्रशिक्षक जोसेफ गोम्बाऊ यांना उद्याच्या सामन्यात विजयाची खात्री वाटते. ते म्हणाले, आमच्यासाठी हा महत्त्वाचा सामना आहे. तीन गुणांचे महत्त्व आमच्यासाठी खूप आहे आणि याच निर्धाराने आम्ही मैदानावर उतरणार आहोत.
ईस्ट बंगालने मागील सामन्यात बंगळुरू एफसीवर 2-1 असा विजय मिळवून आत्मविश्वास कमावला आहे. यंदाच्या पर्वात सर्वाधिक गोल करणाऱ्या अव्वल तीन खेळाडूंमध्ये ईस्ट बंगालचा खेळाडू आहे. क्लेईटन सिल्वाने 7 गोल केले आहेत आणि मुख्य प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टन्टाईन यांनाही माहित्येय की या ब्राझिलीयन खेळाडूला अन्य सहकाऱ्यांच्या मदतीची गरज आहे. तरच ईस्ट बंगाल तालिकेत आगेकूच करू शकतो. ओडिशा एफसी आणि एफसी गोवा यांचा सध्याचा फॉर्म पाहता ईस्ट बंगाल एफसीला प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याची अजूनही संधी आहे.
पण, त्यांची खरी डोकेदुखी वेगळीच आहे. ईस्ट बंगाल एफसीने यंदाच्या पर्वात सर्वाधिक 20 गोल विरोधात होऊ दिले आहेत. तरीही कॉन्सन्टाईन ही आकडेवारी चिंतीत करणारी नसल्याचे म्हणत आहेत. ”आम्ही 2-1 असा विजय मिळवला, तर मला त्याचं काही वाटणार नाही. पण, 3-0 असे पराभूत झालो, तर नक्की चिंतेची गोष्ट असेल. आम्ही जाणीवपूर्वक प्रतिस्पर्धींना गोल करण्याची संधी देतोय असं नाही. हा खेळाचा भाग आहे. जर आम्ही चार सामने नाही जिंकलो, तर ती माझ्यासाठी चिंतेची बाब असेल,” असे ते म्हणाले.
ओडिशा एफसीने आयएसएलमध्ये पाचपैकी एका सामन्यात ईस्ट बंगाल एफसी कडून हार पत्करलेली आहे. ओडिशाने प्रत्येकवेळी निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. या पर्वातील पहिल्या सामन्यात ओडिशाने 4-2 अशा फरकाने ईस्ट बंगालचा पराभव केला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बंड्या मारुती सेवा मंडळ स्थानिक पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा 2023
चेन्नईयन एफसी अजूनही प्ले ऑफच्या शर्यतीत, जमशेदपूर एफसीचा करणार सामना