हिरो इंडियन सुपर लीग २०२२-२३ ( आयएसएल)चा आता मध्यंतरानंतरचा टप्पा सुरू होत आहे आणि या आठवड्याचा पहिला सामना ओडिशा एफसी विरुद्ध एटीके मोहन बागान यांच्यात होणार आहे. भुवनेशवरच्या कलिंगा स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात यजमान ओडिशा एफसी पुन्हा एकदा विजयपथावर परतण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. घरच्या मैदानावर ओडिशाचा विक्रम चांगला असला तरी त्यांना हिरो आयएसएलमध्ये एटीके मोहन बागानवर अद्याप विजय मिळवता आलेला नाही.
ओडिशा एफसीने मागील पाच सामन्यांत तीन सलग विजयांची नोंद केली, परंतु मागील लढतीत एफसी गोवा संघाकडून त्यांना ३-० असा पराभव पत्करावा लागला आहे. त्या सामन्यात नंदाकुमार सेकरला दुसऱ्या हाफमध्ये लाल कार्ड मिळाल्याने मैदानाबाहेर जावे लागले होते. यंदाच्या पर्वात नंदाकुमारने ओडिशाकडून प्रत्येक सामना सुरुवातीपासून खेळला आहे आणि चार गोल केले आहेत. पण, एटीके मोहन बागानविरुद्ध नंदाकुमारशिवाय ओडिशाला मैदानावर उतरावे लागणार आहे. इसाक व्हनलाल्रूत्फेला याला उद्याच्या सामन्यात संधी मिळू शकली असती, परंतु इसाकने दुखापतीमुळे स्वतःला दूर ठेवले आहे.
”लेफ्ट विंग पोझिशनसाठी आमच्याकडे विविध पर्याय उपलब्ध आहेत. नंदाकुमार सेकरच्या जागी कोण खेळेल यावर आम्ही प्रदीर्घ चर्चा केली, परंतु त्याचा निर्णय आम्ही सामन्याच्या आधी घेऊ. मागील आठवड्यात आम्ही गोव्यात चांगली कामगिरी केली होती, परंतु दहा खेळाडूंसह खेळताना निकाल आमच्या विरोधात गेला. खेळाडूंच्या अप्रोचवर मी समाधानी आहे. हिच मानसिकता कायम राखून आम्ही उद्याच्या सामन्यात मैदानावर उतरणार आहोत आणि घरच्या मैदानावर तीन गुण मिळवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहोत, ”असे मुख्य प्रशिक्षक जोसेफ गोम्बाऊ म्हणाले.
एटीके मोहन बागान सलग चौथ्या विजयासाठी प्रयत्नशील असणार आहेत. हिरो आयएसएल २०२०-२१मध्ये त्यांनी अशी कामगिरी केली होती. यंदाच्या पर्वात सलग तीन विजय मिळवताना एटीके मोहन बागानने बचाव कसा असावा हे दाखवून दिले आहे. त्यांनी तीन सामन्यांत एकही गोल स्वीकारला नाही. दिमित्री पेट्राटोसने ८ सामन्यांना ९ गोलमध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष योगदान दिले आहे. यंदाच्या पर्वात एटीके मोहन बागानकडून सर्वाधिक ४ गोल पेट्राटोसने केले आहेत, तर ५ गोलसाठी सहाय्य केले आहे. मनवीर सिंग दुखापतग्रस्त आहे आणि आशिक कुरुनियन त्याच्याजागी फ्लँकवर खेळेल.
”ओडिशा एफसी विरुद्धची लढत सोपी नक्कीच नसेल. हैदराबाद आणि मुंबई सिटी या संघांइतकाच ओडिशाचा संघ आव्हानात्मक आहे. त्यांनी यंदाच्या पर्वात दर्जेदार कामगिरी केली आहे. आम्ही त्यांच्या घरच्या मैदानावर खेळणार आहोत आणि त्यामुळे आमच्यासमोरील आव्हान अधिक वाढले आहे. पण, आम्ही यासाठी सज्ज आहोत,”असे एटीके मोहन बागानचे प्रशिक्षक ज्युआन फेरांडो म्हणाले.
हिरो आयएसएलमध्ये उभय संघांत चार सामने झाले आहेत आणि त्यात एटीके मोहन बागानने दोन विजय मिळवले आहेत, तर दोन सामने अनिर्णित राहिले आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पुरेपूर संधी असताना शतक हुकलेल्या पुजाराची आली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, “आता हे शतक…”
हरमन-शफालीची झुंज अपयशी! तिसऱ्या टी20 मध्ये टीम इंडियाचा पराभव; ऑस्ट्रेलियाची मालिकेत आघाडी