पुढील महिन्यात श्रीलंकेमध्ये भारत, श्रीलंका आणि बांग्लादेश संघात टी २०ची तिरंगी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा काल करण्यात आली. कर्णधार विराट कोहलीला या मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे.
यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीने या दौऱ्यात विश्रांतीची मागणी केल्यामुळे त्याची निवड करण्यात आली नाही.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय संघातील अनेक खेळाडू सातत्याने खेळत असल्यामुळेच ही विश्रांती देण्यात आली आहे. यात भारताचा कर्णधार विराट कोहली, एम एस धोनी, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, हार्दीक पंड्या आणि जसप्रीत बुमराह या खेळाडूंचा सामावेश आहे.
या संघात अनेक तरुण आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना संधी देण्यात आली. परंतु मय़ांक अग्रवाल या देशांतर्गत क्रिकेटमध्ये २०१७-१८ चा मोसम गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र संधी देण्यात आली नाही.
मय़ांकने २०१७-१८ रणजी मोसमात कर्नाटक संघाकडून खेळाताना ८ सामन्यात १३ डावात फलंदाजी करताना १०५.४५ सरासरीने ११६० धावा केल्या. विशेष म्हणजे त्याने २७ दिवसांत १००३ धावा केल्या होत्या.
अापल्या जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर ७ सामन्यात ९०.४२च्या सरासरीने ६३३ धावा करत त्याने कर्नाटक संघाला एकहाती विजय हजारे ट्राॅफीच्या अंतिम फेरीत स्थान मिळवुन दिले आहे. उद्या कर्नाटक विरुद्ध सौराष्ट्र सामन्याकडे अाणि खासकरुन मय़ांकच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष आहे.
सईद अली मुश्ताक ट्राॅफीमध्ये त्याने ९ सामन्यात २८.६६ च्या सरासरीने २५८ धावा करत कर्नाटककडून दुसऱ्या क्रमांकाची चांगली कामगिरी केली आहे.
एवढी चांगली कामगिरी करुनही त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आले नाही. ‘देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना भारत अ कडून चांगली कामगिरी करावी लागते आणि मगच त्यांना राष्ट्रीय संघात स्थान देण्यात येते’ असे कारण यासाठी देण्यात आले आहे.
तसेच राष्ट्रीय संघात सध्या सलामीवीर चांगली कामगिरी करत असल्यामुळे मय़ांकला स्थान देण्यात न आल्याचे बोलले जात आहे.