ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक मालिका विजय मिळवल्यानंतर भारतीय संघासमोर मायदेशात इंग्लंड संघाचे आव्हान असणार आहे. आगामी 5 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यात इंग्लंड संघ बहुचर्चित 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेत भारतीय संघाला विजयाचा दावेदार मानले जात असले तरी, नुकत्याच पार पडलेल्या श्रीलंका दौऱ्यात इंग्लंडने शानदार कामगिरी करत 2-0 ने विजय मिळवला होता.
त्यामुळे दोन्ही संघांमध्ये जबरदस्त संघर्ष बघायला मिळणार हे ठरलेले आहे. अशातच इंग्लंड संघासाठी आनंदाची बातमी समोर येत असून, त्यांचा युवा खेळाडू आॅली पोप पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी दुखापतीतून सावरला आहे.
पोपला मागील वर्षी पाकिस्तान विरुद्ध झालेल्या मालिकेत खांद्याला दुखापत झाली होती. यानंतर पोपने कुठलाही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंड दौऱ्यातही त्याचा संघात समावेश होता पण दुखापतीमुळे त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. आता मात्र डॉक्टरांनी घोषित केले की पोप खांद्याच्या दुखापतीतून पूर्णतः सावरला आहे. पोप आगामी मालिकेत मोईन अली सोबत मधल्याफळीत फलंदाजी करू शकतो.
इंग्लंड संघ भारताच्या दौऱ्यावर 4 कसोटी, 5 टी 20 व 3 वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात 5 फेब्रुवारी पासून चेन्नई येथे होणाऱ्या कसोटी सामन्याने होणार आहे. दोन्ही संघ उत्तम फॉर्ममध्ये असल्याने ही मालिका उत्कंठावर्धक होण्याची सर्व क्रिकेटप्रेमींना अशा असणार आहे. भारतासाठी या मालिकेत नियमित कर्णधार विराट कोहलीसह अनेक महत्त्वाचे खेळाडू पुनरागमन करणार आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या मालिकेत भारतीय संघ उत्तम कामगिरी करेल अशी सर्वांना आशा आहे.
महत्वाच्या बातम्या:
कदाचित भारत ३-० किंवा ४-० फरकाने इंग्लंडला पराभूत करेल, इंग्लंडच्या दिग्गजाची भविष्यवाणी
ऑस्ट्रेलियन भूमीवरील भारताचा विजय अतुलनीय! पाहा कोणी केलंय कौतुक
इंग्लिश गोलंदाजांचा सामना करण्यासाठी किंग कोहलीची जय्यत तयारी, पाहा व्हिडिओ