टी२० विश्वचषत २०२१ स्पर्धेला युएई आणि ओमान येथे रविवारी (१७ ऑक्टोबर) सुरुवात झाली. या स्पर्धेतील पहिला सामना ओमानमध्ये ओमान आणि पापुआ न्यू गिनी (पीएनजी) संघात खेळला गेला. या सामन्याने ७ व्या टी२० विश्वचषक स्पर्धेचा श्रीगणेशा झाला. या सामन्यात ओमानने १० विकेट्सने विजय मिळवत स्पर्धेची दणक्यात सुरुवात केली.
सध्या विश्वचषकात २२ ऑक्टोबरपर्यंत पहिल्या फेरीचे सामने (पात्रता फेरी) खेळवण्यात येणार आहेत. या फेरीतील ब गटात समावेश असलेले ओमान आणि पापुआ न्यू गिनी संघ पहिल्या सामन्यात आमने-सामने होते.
टी२० विश्वचषकात पहिल्यांदाच सामील झालेल्या पापुआ न्यू गिनीला ओमानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना पापुआ न्यू गिनीने २० षटकांत ९ बाद १२९ धावा केल्या होत्या आणि ओमानला १३० धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग ओमानने एकही विकेट न गमावता १३.४ षटकात सहज पूर्ण केला.
ओमानकडून १३० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर जतिंदर सिंगने सर्वाधिक नाबाद ७३ धावा केल्या. त्याने ४२ चेंडूंचा सामना करताना ७ चौकार आणि ४ षटकार मारले. तसेच त्याला आकिब इलियासने तोलामोलाची साथ देताना ४३ चेंडूत ५ चौकार आणि १ षटकारासह ५० धावांची नाबाद खेळी केली. पापुआ न्यू गिनीकडून एकाही गोलंदाजाला विकेट घेण्यात यश आले नाही.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या पापुओ न्यू गिनी संघाची सुरुवात खराब झाली होती. त्यांनी २ षटकांच्या आतच टोनी उरा आणि लेगा सियाका या सलामीवीरांच्या विकेट्स गमावल्या होत्या. पण, त्यानंतर कर्णधार असद वाला आणि चार्ल्स अमिनी यांनी संघाचा डाव सावरताना ८१ धावांची भागीदारी रचली. असदने ४३ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांसह ५६ धावांची खेळी केली.
याशिवाय चार्ल्सने २६ चेंडूत ४ चौकार आणि १ षटकारासह ३७ धावांची खेळी केली. तर, सेस बाऊने १३ धावांची खेळी केली. या तिघांव्यतिरिक्त एकालाही दोन आकडी धावसंख्या पार करता आली नाही. त्यामुळे पापुआ न्यू गिनीने २० षटकांत ९ बाद १२९ धावाच केल्या. ओमानकडून कर्णधार झीशान मकसूदने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. बिलाल खान आणि कलीमुल्लाह यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
आता पापुआ न्यू गिनीचा पुढील सामना १९ ऑक्टोबरला स्कॉटलंड विरुद्ध होणार आहे, तर ओमानचा बांगलादेशविरुद्ध होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
टी २० विश्वचषकाच्या पहिल्याच दिवशी धक्कादायक निकालाची नोंद, बांगलादेश स्कॉटलंडकडून पराभूत
‘क्रिकेटच्या मोठ्या सामन्यासाठी सज्ज’, भारतीय दिग्गजांबरोबर मस्ती करताना अख्तरने केले फोटो शेअर