क्रीडाविश्वात ‘क्रिकेटचा देव’ म्हणून ओळखला जाणारा माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने आजच्याच दिवशी 1989 साली कसोटी क्रिकेटमधील पहिले अर्धशतक केले होते. जेव्हा सचिनने हा पराक्रम केला तेव्हा त्याचे वय फक्त 16 वर्षे 214 दिवस होते आणि तो कसोटी अर्धशतक करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला होता. सध्या हा विक्रम भारतीय महिला खेळाडू शेफाली वर्माच्या नावावर आहे. तिने वेस्ट इंडिजविरुद्ध ग्रॉस आयलेटवर अवघ्या 15 वर्षे 285 दिवसांत अर्धशतक झळकावले आहे. यासह तिने सचिनच्या नावावर असलेला हा जवळपास 30 वर्षे जुना विक्रम आपल्या नावावर केला आहे.
सचिनने आपली पहिली अर्धशतकी खेळी शेजारी देश पाकिस्तानविरुद्ध खेळली होती. फैसलाबादमध्ये सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याला 59 धावा करता आल्या होत्या. यादरम्यान त्याने 172 चेंडूंचा सामना करताना चार चौकारही मारले होते. परंतु त्याचवेळी दुसऱ्या डावातही तो फारसा करिष्मा दाखवू शकला नव्हता आणि 16 चेंडूत एका चौकाराच्या मदतीने आठ धावा करून धावबाद झाला होता.
या सामन्याबद्दल बोलायचे तर, भारत विरुद्ध पाकिस्तानमधील हा सामना अनिर्णित राहिला होता. भारताच्या अनुभवी मधल्या फळीतील फलंदाज संजय मांजरेकरला संपूर्ण सामन्यात उत्कृष्ट फलंदाजी केल्याबद्दल ‘सामनावीर’ पुरस्कार देण्यात आला होता. या सामन्याच्या दोन्ही डावात त्याने उत्कृष्ट फलंदाजी करताना अर्धशतक झळकावले होते. त्याने पहिल्या डावात 76 आणि दुसऱ्या डावात 83 धावा केल्या होत्या.
सचिनच्या कसोटी कारकिर्दीविषयी बोलायचे झाल्यास, त्याने देशासाठी कसोटी क्रिकेटमध्ये 200 सामने खेळताना 329 डावांमध्ये 53.8 च्या सरासरीने 15921 धावा केल्या आहेत. याशिवाय, त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये 463 सामने खेळताना 452 डावांमध्ये 44.8 च्या सरासरीने 18426 धावा केल्या आहेत आणि एक टी20 क्रिकेट सामना खेळताना एका डावात 10.0 च्या सरासरीने 10 धावा केल्या होत्या.
फलंदाजीसोबतच त्याने देशासाठी गोलंदाजीतही महत्त्वाचे योगदान दिले आहे. सचिनने कसोटी क्रिकेटमध्ये 46, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 154 आणि टी20 क्रिकेटमध्ये एक विकेट घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आयसीसी नवी टी२० क्रमवारी जाहीर: विराट टॉप टेनमधून बाहेर; तर रोहित-राहुल ‘या’ स्थानावर
रिषभ पंतच्या फॉर्मने वाढवली चिंता? भारतीय क्रिकेटर म्हणाला, ‘तो सलग २ वर्षांपासून खेळतोय, त्यालाही…’
श्रेयसने व्हिडिओद्वारे दाखवला रुग्णालयापासून कसोटी पदार्पणापर्यंतचा प्रवास; व्हिडिओ नक्की पाहा