तुम्ही क्रिकेटप्रेमी आहात आणि तुम्हाला १२ मार्च २००६ म्हणजे सोळा वर्षांपूर्वी क्रिकेटजगतात घडलेली एक असामान्य घटना माहित नाही, असे होऊच शकत नाही. क्रिकेटच्या मैदानावर या दिवशी खऱ्या अर्थाने इतिहास लिहिला गेला होता. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील या सामन्याने तमाम चाहत्यांच्या डोळ्याचे पारणे फेडले होते. वनडे क्रिकेटच्या इतिहासातील आजवरचा सर्वोत्तम सामना अशी ओळख असलेल्या या सामन्याविषयी आज आपण जाणून घेऊया ज्यामध्ये, विक्रमांची अक्षरशः रास लागली.
ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिका दौरा
त्यावेळी क्रिकेटविश्वात धाक असणारा ऑस्ट्रेलियाचा संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला होता. दौऱ्याच्या सुरुवातीला खेळला गेलेला एकमेव टी२० सामना यजमान दक्षिण आफ्रिकेने खिशात घातला. त्यानंतर, पाच सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात झाली. वनडे मालिकेतील पहिले दोन सामने जिंकत यजमानांनी वनडे मालिका देखील खिशात घालण्याचे मनसुबे जाहीर केले. मात्र, हार मानेल तो ऑस्ट्रेलिया कसला? पुढील दोन सामन्यात दक्षिण आफ्रिकेला लोळवत, ऑस्ट्रेलियाने मालिकेत पुनरागमन केले आणि जोहान्सबर्ग येथील वॉन्डरर्स स्टेडियमवर होणाऱ्या अखेरच्या सामन्याला अंतिम सामन्याचे रूप दिले.
ऑस्ट्रेलियाने उभारली विश्वविक्रमी धावसंख्या
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ग्रॅमी स्मिथ व ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉंटिंग हे वॉन्डरर्सच्या मैदानावर नाणेफेकीसाठी उतरले, तेव्हा कोणालाही माहीत नव्हते की, आज या मैदानावर काहीतरी ऐतिहासिक घटना घडणार आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
ऑस्ट्रेलियासाठी यष्टीरक्षक ॲडम गिलख्रिस्ट व सायमन कॅटिचने डावाची सुरुवात केली. गिलख्रिस्ट आपल्या चिरपरिचित अंदाजात खेळू लागला. कॅटिचने आपली नांगर टाकण्याची जबाबदारी निभावण्यास सुरुवात केली. अवघ्या १५.२ षटकात ९७ धावांची सलामी दिल्यानंतर ही जोडी फुटली. गिलख्रिस्टने ४४ चेंडूत ९ चौकारांचे वळ उठवत ५५ धावांची स्फोटक खेळी केली. गिलख्रिस्ट बाद झाल्यानंतर धावांची गती कमी होईल, असेल दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना वाटले असेल. मात्र, कर्णधार पॉंटिंगच्या मनात काहीतरी वेगळेच होते. त्याने, गिलख्रिस्टचा कित्ता गिरवत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली. दोघांनीही दुसऱ्या गड्यासाठी अवघ्या १५ षटकात ११९ धावा ठोकल्या. ७९ धावांची खेळी खेळून कॅटिच माघारी परतल्यानंतर, माईक हसीने मैदानात पाऊल टाकले.
हसीचे आक्रमण आणि पाँटिंगची कॅप्टन्स इनिंग
सुरुवातीला गिलख्रिस्ट-कॅटिच व त्यानंतर पॉंटिंगने केलेली फटकेबाजी फिकी पडावी अशी फलंदाजी हसीने केली. पॉंटिंग व हसीने अवघ्या १०० चेंडूमध्ये १५८ धावांची अतिआक्रमक भागीदारी केली. यामध्ये हसीचे योगदान होते ५१ चेंडूमध्ये ८१ धावांचे. या खेळीदरम्यान हसीने ९ चौकार व ३ षटकारांची आतिषबाजी केली होती. ४८ व्या षटकात १०५ चेंडूत १६४ धावांची ‘कॅप्टन्स इनिंग’ खेळून पॉंटिंग माघारी परतला. अखेरीस, अँड्र्यू सायमंड्सने आपला हिसका दाखवत १३ चेंडूत २७ धावा काढून ऑस्ट्रेलियाला ४३४ धावांपर्यंत मजल मारून दिली. ४३४ ही त्यावेळची वनडे क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या म्हणून नोंदवली गेली.
कॅलिसच्या शब्दांनी केला चमत्कार
जेव्हा लक्ष्य म्हणून समोर ४३५ हा आकडा दिसत असतो त्यावेळी, सर्वांचाच आत्मविश्वास डगमगू लागतो. मात्र, दक्षिण आफ्रिका संघातील कोणाचेच त्यादिवशी असे झाले नाही. यामागील कारण होता, संघाचा प्रमुख अष्टपैलू जॅक कॅलिस.
ऑस्ट्रेलियाचा डाव संपला तेव्हा संपूर्ण संघ प्रशिक्षक मिकी आर्थर यांच्याभोवती गोळा झाला. इतक्या मोठ्या धावांचा पाठलाग करण्याची रणनीती काय? असा सवाल त्यांना केला गेला. आधीच वैतागलेले आर्थर म्हणाले, “तुम्ही मला असं विचारत आहात, जसे काय मी रोज ४३४ धावांचा पाठलाग करतो!”
ही गोष्टही बरोबर होती. मात्र, त्यानंतर संघातील वरिष्ठ जॅक कॅलिस पुढे आला. तो म्हणाला की, “आपण उत्तम गोलंदाजी केली. ऑस्ट्रेलियाने १५ धावा कमी धावा केल्या आहेत. ही खेळपट्टी साडेचारशे धावांची आहे. ते लोक मागे पडले आहेत.”
अनेकांना हा विनोद वाटेल. मात्र, कॅलिसच्या त्या वाक्याचा जादुई परिणाम झाला. यामुळे सर्व खेळाडूंवरील दबाव दूर झाला. जेव्हा आफ्रिकन संघाने पुन्हा मैदानात प्रवेश केला, तेव्हा त्यांचे मनोबल गगनाला भिडले होते.
गिब्सची ऐतिहासिक खेळी
चोकर्सचा शिक्का बसलेला दक्षिण आफ्रिका संघ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आला. दुसऱ्या षटकात संघाच्या तीन धावा झाल्या असताना, सलामीवीर बोएटा डिप्पेनार बाद झाला. मात्र, त्यानंतर कर्णधार ग्रॅमी स्मिथ आणि आपल्या अंतरंग वागण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या हर्शल गिब्सने ऑस्ट्रेलियावर वर्चस्व दाखवायला सुरुवात केली. ५५ चेंडूत ९० धावा काढून स्मिथ बाद झाला परंतु गिब्सने आपली दहशत कायम ठेवली. त्यादिवशी तो, असामान्य खेळाडू भासत होता. त्याने १११ चेंडूत १७५ धावा केल्या. ज्यामध्ये ७ षटकार आणि २१ चौकारांचा समावेश होता. जेव्हा गिब्स चौथा गडी म्हणून बाद झाला, तेव्हा दक्षिण आफ्रिका लक्ष्यपासून १३६ धावा दूर होती आणि १०७ चेंडू टाकले जाणे बाकी होते.
गिब्स बाद झाल्यानंतर दक्षिण आफ्रिका सामना हरते का काय? अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, व्हॅन डर वाथने १८ चेंडूत ३४ धावांची आक्रमक खेडी करून धावगती कमी होऊ दिली नाही. अनुभव यष्टीरक्षक मार्क बाऊचर हा दुसऱ्या बाजूने मैदानावर ठामपणे उभा होता.
अखेरच्या षटकाचा थरार
अखेरच्या पाच चेंडूमध्ये दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी सहा धावांची आवश्यकता होती. गोलंदाज म्हणून खेळणाऱ्या ऍण्ड्रू हॉलने तेव्हाचा ऑस्ट्रेलियाचा प्रमुख गोलंदाज ब्रेट लीला चौकार ठोकून विजयासाठी ४ चेंडूत २ धावा असे समीकरण आणून ठेवले. मात्र, पुढच्याच चेंडूवर हॉल मायकल क्लार्कच्या हाती झेल देत तंबूत परतला. त्यानंतर, अखेरचा गडी म्हणून मखाया एन्टिनी मैदानात उतरला. लीसमोर त्याचा निभाव लागणार का? असा प्रश्न सर्वांना पडला असताना, त्याने एक धाव घेत सामना बरोबरीत आणला. अखेरीस, पाचव्या चेंडूवर नजर बसलेल्या मार्क बाऊचरने चौकार मारून अर्धशतक पूर्ण करत, संघाला विश्वविक्रमी विजय मिळवून दिला. वॉन्डरर्सवर दक्षिण आफ्रिकेने ‘न भूतो’ कामगिरी केली होती.
विक्रमांची लागली रास
हा सामना अनेक प्रकारे अनोखा होता. एक म्हणजे यासामन्यात वनडे क्रिकेटमधील सर्वात मोठी धावसंख्या उभारली गेली, ज्याचा पाठलाग त्याच दिवशी करण्यात आला. या संपूर्ण सामन्यात ८७ चौकार आणि २६ षटकार लगावले गेले. म्हणजेच केवळ चौकार आणि षटकारांद्वारे ५०४ धावा बनविल्या गेल्या. तो दिवस गोलंदाजांसाठी अक्षरशः काळा दिवस होता. ऑस्ट्रेलियाच्या मिक लुईसने १० षटकांत ११३ धावा दिल्या. हा महागड्या गोलंदाजीचा आजही विक्रम आहे. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने ती मालिका आपल्या नावे केली. या सामन्यात रिकी पॉंटिंग आणि हर्षल गिब्स या दोघांना देखील सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
नशेच्या अमलाखाली केलेली ती ऐतिहासिक खेळी
या सामन्याचा खरा नायक ठरलेला हर्शेल गिब्स हा ती १७५ धावांची खेळी नशेच्या अमलाखाली खेळला होता. या गोष्टीचा खुलासा ऑस्ट्रेलियाचा मधल्या फळीतील फलंदाज माईक हसीने केला होता. हसी म्हणाला, “सामन्याच्या आदल्या दिवशी आम्ही डिनरसाठी चाललो होतो तेव्हा गिब्स दारू पीत होता. डिनरवरून आल्यानंतर ही तो तिथेच होता. त्यानंतर, आमच्या संघाची मिटिंग झाली. त्या मिटींगवरून परतलो तेव्हा मला तेथेच दिसला. काही तासांनंतर देखील मी बाल्कनीमधून त्याला त्याच जागेवर पाहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी देखील तो नशेत होता. त्यामुळे, हे नक्की होते की, त्याच्या दारूची नशा दुसऱ्या दिवशीच्या सामन्यावेळी देखील होती.” गिब्सने देखील नंतर ही गोष्ट मान्य केली.
खऱ्या अर्थाने ऐतिहासिक म्हणावा असा हा सामना क्रिकेटप्रेमींच्या मनात आजही घर करून आहे.
वाचा –
भारतीय क्रिकेटची पहिली रनमशीन : विजय हजारे
एका ऑस्ट्रेलियननेच त्याला बनवले ‘व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण’
एकवेळ क्रिकेट सोडण्याच्या विचारात असलेला रॉस टेलर, आता बनलाय सार्वकालिन महान फलंदाज