रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) हा संघ इंडियन प्रीमियर लीगच्या त्या संघापैकी एक आहे, ज्यांना आजवर एकदाही जेतेपद पटकावता आलेले नाही. तरीही या संघाने आयपीएलप्रेमींच्या मनात घर केले आहे. यामागचे कारण म्हणजे, त्यांच्या प्रदर्शनातील निरंतरता आणि एकाहून एक सरस दिग्गजांची उपस्थिती. त्यातही आरसीबीचा संघनायक विराट कोहली आणि विस्फोटक फलंदाज एबी डिविलियर्स यांचा एक वेगळाच चाहतावर्ग आहे.
क्रिकेटविश्वातील या अव्वलदर्जाच्या फलंदाजांची झंझावती फलंदाजी पाहण्यासाठी क्रिकेटरसीक नेहमीच आतुर असतात. त्यातही या दोघांची जोडी मैदानावर स्थिरावली तर दर्शकांसाठी ती पर्वणीच ठरते. बरोबर आजच्याच दिवशी ६ वर्षांपुर्वी बंगळुरूच्या मैदानावर आयपीएलप्रेमींना या जोडीच्या तूफानी खेळीचे दर्शन घडले होते.
‘रनमशीन’ कोहली आणि ‘मिस्टर ३६०’ डिविलियर्सच्या २०० हून अधिक धावांच्या भागिदारीने सामन्याची रंगत तर वाढवलीच होती, सोबतच मोठा विश्वविक्रम आपल्या नावे केला होता आणि संघाला तब्बल १४४ धावांनी विजय मिळवून दिला होता. चला तर उजाळा देऊया, त्या रंगतदार सामन्यातील त्या अविस्मरणीय भागिदारीला.
विराट-डिविलियर्सची विक्रमतोड भागिदारी
मे १४, २०१६ रोजी बंगळुरूच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध गुजरात लायन्स यांच्यात हंगामातील ४४ वा सामना झाला होता. या सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकत प्रतिस्पर्धी आरसीबीला फलंदाजीचे आमंत्रण दिले होते. सुरुवातीला फलंदाजीला आलेल्या आरसीबीला पावरप्लेमध्येच ख्रिस गेलच्या रुपात धक्का बसला होता. तो अवघ्या ६ धावांवर त्रिफळाचीत झाला होता. त्यामुळे तिसऱ्या क्रमांकावर डिविलियर्स फलंदाजीस उतरला होता.
आधीपासूनच मैदानावर उपस्थित असलेला विराट आणि नुकताच फलंदाजीस आलेला डिविलियर्स या जोडीकडून आरसीबीच्या चाहत्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. या धुरंधरांनीही त्यांना निराश केले नाही. डावातील अंतिम षटकापर्यंत मैदानावर तळ ठोकत त्यांनी धुव्वादार फलंदाजी केली होती. ९६ चेंडूत त्यांनी दुसऱ्या विकेटसाठी २२९ धावांची भागिदारी साकारली होती. १९.५ षटकात कोहली झेलबाद झाल्याने ही भागिदारी मोडली होती.
यात कोहलीच्या ५५ चेंडूतील १०९ धावांचा समावेश होता. ८ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने त्याने ही खेळी केली होती. तर डिविलियर्सने डावाखेर नाबाद राहत १२९ धावा चोपल्या होत्या. ५२ चेंडूंचा सामना करताना १२ षटकार आणि १० चौकार मारत त्याने ही धावसंख्या उभारली होती. त्यांच्या या भागिदारीमुळे आरसीबीने गुजरातला २४९ धावांचे आव्हान दिले होते. मात्र गुजरातचा संघ अवघ्या १०४ धावांवरच गारद झाला होता.
आयपीएल इतिहासातील सर्वात मोठी भागिदारी
विराट आणि डिविलियर्स यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी झालेली २२९ धावांची भागिदारी आयपीएल इतिहासातील सर्वोत्कृष्ट भागिदारी ठरली होती. सोबतच ट्वेंटी ट्वेंटी स्वरुपातील दुसरी सर्वात मोठी भागिदारी ठरली होती. या स्वरुपात दुसऱ्या विकेटसाठी सर्वाधिक धावांची भागिदारी करण्याचा विश्वविक्रम २३ फेब्रुवारी २०१९ रोजी अफघानिस्तानच्या फलंदाजांनी २३६ धावांची भागिदारी करत नोंदवला होता.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘मी आणखी करू तरी काय?’, अवघ्या २० धावांवर तंबूत परतताना विराटची रिऍक्शन कॅमेऱ्यात कैद; चाहतेही दु:खी