---Advertisement---

टीम इंडियाच्या एकेवेळच्या ‘या’ ६ मजबूत खांबाबद्दलचे लक्ष्मणचे हे खास शब्द वाचलेत का?

---Advertisement---

मुंबई । भारताचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण हा नेहमी सोशल मीडियावर चर्चेत राहतो. त्याच्या कारकीर्दीत त्याने अनेक ऐतिहासिक खेळी करून भारताला विजय मिळवून दिला. 2000 साली कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध जबरदस्त द्विशतकीय खेळी केली. त्याच्या या खेळीमुळेच सिकंदराच्या आविर्भावात आलेल्या स्टीव वॉचा संघाला भारतात पराभूत व्हावं लागलं. 

सर्वात रोमहर्षक कामगिरी करणारा लक्ष्मण म्हणतो की, “माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथने भारतीय गोलंदाजीमध्ये क्रांती घडवून आणली.” लक्ष्मण सध्या त्या खेळाडूंचे फोटो शेअर करतोय ज्यांच्या खेळीने त्याच्यावर खूपच प्रभाव पडला आहे. श्रीनाथ पूर्वी त्याने सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड आणि अनिल कुंबळे यांच्यावर कौतुकाची उधळण केली आहे.

‘म्हैसूर एक्सप्रेस’ नावाने प्रसिद्ध असलेल्या जवागल श्रीनाथने ऑक्टोंबर 1991साली पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात पदार्पण केलं. त्याने भारताकडून 67 कसोटी आणि 229 एकदिवसीय सामने खेळला. यात त्याने अनुक्रमे 229 आणि 315 बळी घेतले.

लक्ष्मणने ट्विटमध्ये लिहिले की, “म्हैसूरमधून आलेला या गोलंदाजाने भारतीय गोलंदाजीत क्रांती आणली. संघातल्या इतर गोलंदाजांकडून त्याला साथ मिळत नसतानाही त्याने कठीण प्रसंगात दमदार कामगिरी करण्याची क्षमता त्यांच्यात होती. अनेक गोलंदाजांना त्याने प्रेरित केले.”

लक्ष्मणने यापूर्वी त्याचा सहकारी खेळाडू राहुल द्रविड यांच्यासोबतचा एक जुना फोटो शेअर करत ट्विटमध्ये लिहिले की, “राहुल द्रविड प्रत्येक सामन्यात स्वतःला झोकून देऊन खेळणारा एक ‘टीम मॅन’ आहे. प्रत्येक कठीण परिस्थितीचा  धाडसाने सामना केला. नाही हा शब्द त्याच्या डिक्शनरीमध्ये नव्हता. एकदिवसीय क्रिकेटमध्ये अतिरिक्त यष्टीरक्षणाची जबाबदारी व त्यासोबत कसोटीत सलामीला खेळून संघाला मदतीचा हात दिला.!

लक्ष्मणने माजी दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे यांचा 2000 साली वेस्ट इंडीज दौऱ्यातील अँटिगा कसोटीतला फोटो शेअर केला होता.  त्यावेळी अनिल कुंबळेने डोक्याला आणि तोंडाला जबरदस्त मार लागलेला असतानाही तो संघहितासाठी गोलंदाजी करण्यास मैदानात उतरला. लक्ष्मणने त्याचे कौतुक करताना म्हणाला की, “अनिल कुंबळे हा दिग्गज खेळाडू होता. सर्व अडचणींना पाठीमागे टाकत त्याने आपली जबाबदारी पार पडली. धाडस आणि दृढ निश्चय सारखे गुण त्याच्यात होते. कधी हार न मानणारा हा खेळाडू.”

लक्ष्मणने बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांचा लॉर्ड्सच्या मैदानावर नेटवेस्ट ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात टी शर्ट काढून गरागरा फिरवत असतानाचा फोटो शेअर केला आहे. लक्ष्मणने ट्विट केले की, “गर्व करावा असा हा माणूस! इतरांपेक्षा वेगळेपण जपणारा सौरव गांगुली. गुणवत्तापूर्ण खेळाडूंना संधी देत त्यांच्याकडून कामगिरी करून घेतली. त्या खेळाडूंचे भविष्य उज्ज्वल केले. याचे सारे श्रेय सौरव गांगुलीला जाते. भारताच्या सर्वाधिक यशस्वी कर्णधारांमध्ये त्याला स्थान दिले जाते.”

लक्ष्मणने ट्विटरवर सर्वात पहिला फोटो शेअर केला तो सचिन तेंडुलकर यांचा. लक्ष्मणने ट्विटमध्ये लिहिले की, “त्यांची कारकीर्द ऐतिहासिक क्षणांनी भरलेली आहे. मैदानाला मंदिर म्हणून त्याचं पावित्र्य जपणारे. आकाशात राहून जमिनीवर घट्ट पायाने उभे राहण्याची नम्रता. हेच त्यांचे वेगळपण आहे.”

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---