आयपीएल २०२६ चा २० सामना मुंबई इंडियन्स (एमआय) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) यांच्यात खेळला गेला. रविवारी (१२ एप्रिल) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात आरसीबीने १८ धावांनी विजय मिळवला. हा विजय आरसीबीच्या कृणाल पांड्यासाठी अधिकच विशेष ठरला. आपल्या पूर्वीच्या फ्रॅंचायजीविरुद्ध जिंकल्यानंतर त्याने आनंद व्यक्त केला आहे. तो सामन्यानंतर मिश्किलपणे म्हणाला, हा सामना एकातरी पांड्याला जिंकावाच लागणार होता.
या सामन्यात एमआयचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकत आरसीबीला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. त्यामध्ये आरसीबीने विराट कोहली, फिल सॉल्ट आणि कर्णधार रजत पाटीदार यांच्या अर्धशतकांच्या जोरावर २० षटकात ४ विकेट्स गमावत २४० धावासंख्येचा डोंगर उभा केला. त्यामध्ये टीम डेविडच्या नाबाद ३४ (१६ चेंडू) धावांचाही समावेश आहे.
एमआय लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीकडून कृणालने चार षटकात २६ धावा देत एक विकेट घेतली. त्याने भारताचा टी२० कर्णधार सूर्यकुमार यादवला बाद केले. त्यावेळी सूर्यकुमार २२ चेंडूत ५ चौकार मारत ३३ धावांवर खेळताना धोकादायक वाटत होता. त्याचक्षणी कृणालने टाकलेल्या १३ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर तो बाद झाला. कृणालने मधल्या षटकांमध्ये प्रभावी गोलंदाजी केल्याने एमआयच्या धावांचा वेग कमी झाला. त्याला त्या खेळपट्टीचे चांगलेच ज्ञान आहे, असे दिसले.
कृणाल सामन्यानंतर म्हणाला, “वानखेडे नेहमीच माझ्या हृद्याच्या जवळ राहिले आहे. मी येथे 6 वर्षे खेळलो आणि त्या काळात तीन ट्रॉफी जिंकण्याचे भाग्य मला लाभले. त्यामुळे इथे येणं नेहमीच खास राहिलं आहे. मी मागील वर्षीही म्हटल्याप्रमाणे अखेरीस गुण घरी येणारच. एका पांड्याला जिंकायचंच होत आणि मला वाटत त्या बाबतीत मी नशीबवान ठरलो.”
कृणाल २०२५ मध्ये लखनऊ सुपर जायंट्सकडून आरसीबीमध्ये दाखल झाला. तो संघाचा मुख्य खेळांडूपैकी एक बनला. मागील हंगामात त्याने संघाच्या विजेतेपदात महत्वाची भुमिका बजावली होती. त्याने तेव्हा १५ सामन्यात २२.२९ च्या सरासरीने १७ विकेट्स घेतल्या होत्या. त्याचबरोबर त्याने पंजाब किंग्जविरुद्धच्या त्या शेवटच्या सामन्यात ४ षटकात १७ धावा देताना २ विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. यामुळे तो सामनावीरही ठरला होता. त्यामुळे तो आयपीएलच्या दोन अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्कार पटकावणारा एकमेव खेळाडू ठरला आहे.
कृणालने एमआयकडून २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये आयपीएल विजेतेपद जिंकले आहेत. त्याने गोलंदाजी करताना फलंदाजांविरुद्ध बाऊन्सरचा यशस्वीरित्या वापर केला आहे, जे फिरकी गोलंदाजांसाठी खूप विशेष आहे. हेच त्याच्या यशामागचे रहस्य आहे.






