भारतीय क्रिकेट संघाचे माजी दिग्गज फलंदाज आणि ‘लिटिल मास्टर’ म्हणून प्रसिद्ध असलेले सुनील गावस्कर आज त्यांचा 75वा वाढदिवस साजरा करत आहेत. सुनील गावस्कर या वयातही सक्रिय आहेत. ते सध्या समालोचन करत असून ते अनेकदा युवा खेळाडूंना महत्त्वाच्या टिप्स देत असतात. नुकतेच सुनील गावस्कर यांनी भारतीय संघाला आगामी जागतिकी कसोटी चॅम्पियनशिपचं (WTC) विजेतेपद जिंकायचं असेल तर एका खेळाडूला संघात पुनरागमक करावं लागेल, असा सल्ला दिला आहे.
सुनील गावस्कर यांनी ‘रेव्ह स्पोर्ट्स’शी बोलताना ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी आणि डब्ल्यूटीसी विजेतेपदाच्या संदर्भात मोठं विधान केलं. गावस्कर म्हणाले, “हो आपण नक्कीच दोन्ही ठिकाणी यशस्वी होऊ शकतो. मला वाटतं की पुढील दोन महिने हार्दिक पांड्याला कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी पटवण्याचा प्रयत्न करायला हवा. हार्दिकनं एका दिवसात 10 षटकं टाकली आणि त्याच्या स्फोटक शैलीत फलंदाजी केली, तर भारताला पराभूत करणं अशक्य होईल. हार्दिक संघात असल्यास भारत ऑस्ट्रेलियात विजयाची नोंद करू शकतो आणि डब्ल्यूटीसी विजेतेपदही जिंकू शकतो.”
टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या हा प्रामुख्याने मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्येच खेळतो. हार्दिकनं शेवटचा कसोटी सामना 6 वर्षांपूर्वी 2018 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता. या सामन्यानंतर हार्दिक क्रिकेटच्या सर्वात जुन्या फॉरमॅटपासून दूर राहिला आहे. मात्र, सुनील गावस्कर यांच्या वक्तव्यानंतर आता हार्दिकनं कसोटी संघात पुनरागमन करावं, अशी चर्चा सुरू झाली आहे.
हार्दिकनं त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत 11 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्यानं एक शतक आणि 4 अर्धशतकांच्या मदतीनं 532 धावा केल्या आहेत आणि 17 विकेट्सही आपल्या नावावर केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
कोहली-रोहित नव्हे तर या फलंदाजाला गोलंदाजी करणं अवघड जातं, जेम्स अँडरसनचा खुलासा
टी20 क्रमवारीत ऋतुराज गायकवाडची मोठी झेप, शतकवीर अभिषेक शर्माचीही धमाकेदार एंट्री
गौतम गंभीर हेड कोच बनला, आता ‘या’ 3 खेळाडूंना संघात पुन्हा स्थान मिळण्याची शक्यता नाही