भारताने मंगळवारी (२९ डिसेंबर) बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ८ विकेट्सने पराभव केला. याबरोबरच ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. हा सामना भारतासाठी जितका खास ठरला तसाच तो अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजासाठीही खास होता.
हा जडेजाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील ५० वा कसोटी सामना होता. त्यामुळे त्याने एक विशेष विक्रम केला आहे. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील वनडे, टी२० आणि कसोटी अशा तिन्ही प्रकारात प्रत्येकी ५० किंवा त्यापेक्षा जास्त सामने खेळणारा भारताचा तिसरा क्रिकेटपटू ठरला आहे.
याआधी असा विक्रम केवळ भारताच्या आजी-माजी कर्णधारांना म्हणजेच विराट कोहली आणि एमएस धोनीला करता आला आहे.
जडेजाने त्याच्या कारकिर्दित ५० कसोटी, १६८ वनडे आणि ५० आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. यात मिळून त्याने ३२.७ च्या सरासरीने १ शतक आणि २८ अर्धशतकांसह ४५५४ धावा केल्या आहेत. तसेच त्याने ४४३ विकेट्सही घेतल्या आहेत.
विराट-धोनीचे आंतरराष्ट्रीय सामने –
विराटने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ८७ कसोटी, २५१ वनडे आणि ८५ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. यात त्याने ५५.९९ च्या सरासरीने ७० शतकं आणि १०८ अर्धशतकांसह २२२८६ धावा केल्या आहेत. तसेच धोनीने त्याच्या कारकिर्दीत ९० कसोटी, ३५० वनडे आणि ९८ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले असून यात त्याने ४४.९६ च्या सरासरीने १७२६६ धावा केल्या आहेत. तसेच त्याने १६ शतके आणि १०८ अर्धशतकेही त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत केली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
“ऑस्ट्रेलियन खेळाडूंकडून रहाणेची स्तुती ऐकून मी भारावलो”, भारतीय दिग्गजाचे विधान
मेलबर्न कसोटीतील विजयानंतर सौरव गांगुलीने ट्विट करत केले भारतीय संघाचे अभिनंदन, म्हणाला…
…म्हणून न्यूझीलंडचे खेळाडू पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीत काळी पट्टी बांधून उतरले मैदानात