कसोटी क्रिकेटमध्ये केवळ ४ खेळाडूंनी सामन्यात ४०० धावांचा टप्पा पार केला आहे. अनेक क्रिकेटप्रेमींना माहित आहे की कसोटी डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराच्या नावावर आहे.
लाराने कसोटी डावात इंग्लंडविरुद्ध खेळताना १० एप्रिल २००४ रोजी नाबाद ४०० धावांची खेळी केली होती. परंतु लारापुर्वी काही खेळाडू असेही झाले आहेत ज्यांनी कसोटी सामन्यात ४०० पेक्षाही अधिक धावा केल्या आहेत, परंतु त्यांची फारशी चर्चा झाली नाही.
ग्रॅहम गूच (४५६ धावा)
२६ जुलै १९९० रोजी इंग्लंडचे फलंदाज ग्रॅहम गुच यांनी भारताविरुद्ध खेळताना लाॅर्ड्स कसोटीत पहिल्या डावात ३३३ तर दुसऱ्या डावात १२३ धावांची खेळी केली होती. यामुळे कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. हा सामना इंग्लंडने २४७ धावांनी जिंकला होता. विशेष म्हणजे ग्रॅहम गूच या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार होता.
मार्क टेलर (४२६ धावा)
१५ ऑक्टोबर १९९८ रोजी पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पेशावर येथे झालेल्या कसोटी सामन्यात मार्क टेलर यांनी पहिल्या डावात नाबाद ३३४ तर दुसऱ्या डावात ९२ धावा केल्या होत्या. यामुळे त्या सामन्यात त्यांनी एकूण ४२६ धावा केल्या. हा सामना अनिर्णित राहिला परंतु या सामन्यात टेलर हे ऑस्ट्रेलियाचे कर्णधार होते.
कुमार संगकारा (४२४ धावा)
४ फेब्रुवारी २०१४ रोजी बांगलादेश विरुद्ध श्रीलंका कसोटी सामन्यात चितगाव, बांगलादेश येथे कुमार संगकाराने पहिल्या डावात ३१९ तर दुसऱ्या डावात १०५ धावांची खेळी केली होती. यामुळे त्या सामन्यात त्याने एकूण ४२४ धावा केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये सामन्यात त्रिशतकी व शतकी खेळी करणारा तो ग्रॅहम गूच यांच्यानंतर जगातील दुसराच खेळाडू ठरला होता. हा सामना देखील अनिर्णित राहिला होता.
ब्रायन लारा (४०० धावा)
१० ते १४ एप्रिल २००४ रोजी इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यातील पहिल्या डावात ब्रायन लाराने शानदार नाबाद ४०० धावांची खेळी केली होती. कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात ४०० धावा करणारा तो पहिला खेळाडू ठरला होता. त्याला दुसऱ्या डावात फलंदाजीची संधी मिळाली नाही. त्यामुळे कसोटी सामन्यात त्याच्या नावावर ४०० धावांचं राहिल्या.