ज्यांनी 1999 ला झालेला विश्वचषक पाहिला असेल त्यांना 26 मे हा दिवस चांगलाच लक्षात असेल. या दिवशी द कूपर असोसिएट्स काउंटी ग्राउंड, टॉन्टनला सौरव गांगुली आणि राहुल द्रविडने खेळलेली अफलातून भागिदारी अनेकांनी आपल्याकडे सेव्ह करुन ठेवली असणार.
आजपासून बरोबर 23 वर्षांपूर्वी 1999 च्या विश्वचषकात साखळी फेरीत श्रीलंकेविरुद्ध भारताने सदागोपन रमेशची विकेट लवकर गमावली, त्यामुळे राहुल द्रविडला लवकर फलंदाजीला यावं लागलं. त्यावेळी खेळपट्टीवर सौरव गांगुली आणि द्रविडची जोडी जमली. या जोडीने भारताच्या डावाला फक्त आकारच दिला नाही तर श्रीलंकेच्या गोलंदाजांची अक्षरश: पिसे काढली. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी या जोडीला तोडण्याचे सगळे प्रयत्न करुन झाले होते परंतू तरीही हे दोघांची विकेट मिळत नव्हती.
अखेर मुथय्या मुरलीधरनने द्रविडला धावबाद करत ही जोडी फोडली. पण तोपर्यंत दुसऱ्या विकेटसाठी गांगुली आणि द्रविडने आक्रमक खेळ करत 318 धावांची भागिदारी रचून भारताला भक्कम स्थितीत आणून ठेवले होते. त्यावेळी त्यांनी दुसऱ्या विकेटसाठीच नाही तर वनडेमध्ये सर्वोच्च भागिदारी रचण्याचा विश्वविक्रम रचला होता.
या सामन्यात गांगुलीने 158 चेंडूत 7 षटकार आणि 17 चौकारांसह 183 धावांची तुफानी खेळी केली होती. ही त्याच्या वनडे काराकीर्दीतील सर्वोच्च धावसंख्याही ठरली. त्याने त्याचे शतक 119 चेंडूत करताना पुढील 83 धावा फक्त 39 चेंडूत फटकावल्या होत्या. त्याला अखेर प्रामुद्या विक्रमासिंघेने बाद केले.
द्रविडनेही या सामन्यात आक्रमक खेळताना 129 चेंडूत 145 धावा केल्या. त्याच्या या खेळीत त्याने 17 चौकार आणि 1 षटकार मारला. विशेष म्हणजे मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये अनफिट ठरवलेल्या द्रविडचे नाव मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये दोन सर्वोच्च भागिदाऱ्यांमध्ये आहे.
या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 6 बाद 373 धावा केल्या होत्या. तर या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेला सर्वबाद 216 धावाच करता आल्या.
26 मे 1999 ला गांगुली आणि द्रविडने केलेला भागिदारीचा विश्वविक्रम नंतर त्याच वर्षी सचिन तेंडूलकर आणि द्रविडनेच न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळताना मोडला. त्यांनी न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या वनडेत 331 धावांची भागिदारी करत हा विक्रम मोडला.
145 from 129 balls 👏
One of Rahul Dravid's greatest ODI knocks came against Sri Lanka at the 1999 @cricketworldcup, as a mammoth 318-run partnership with Sourav Ganguly took India to a total of 373/6. pic.twitter.com/vkUxSwXAk7
— ICC (@ICC) January 11, 2019
सध्या 26 मे 1999 ला गांगुली आणि द्रविडने केलेली भागिदारी वनडेतील चौथ्या क्रमांकाची भागिदारी आहे. या यादीत सध्या अव्वल स्थानी ख्रिस गेल आणि मार्लन सॅम्युअल्सने रचलेली 372 धावांची भागिदारी आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर जॉन कॅम्पबेल आणि शाय होपने 2019 साली आयर्लंड विरुद्ध केलेली 365 धावांची भागीदारी आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
रजत पाटीदारला कृणालच्या ‘त्या’ षटकातच आला शतक करण्याचा कॉन्फिडन्स, वाचा त्याची प्रतिक्रिया
एलिमिनेटरचा वाईट इतिहास पुसत बेंगलोरची क्वालिफायर २मध्ये ‘रॉयल’ एन्ट्री, विजयाचा जल्लोष बघण्यासारखा
लेट पण थेट! हुड्डाची विकेट घेत हसरंगाचा नाद खुळा विक्रम; ताहिर अन् चहलसोबत खास यादीत सामील