चेक प्रजासत्ताकची टेनिसपटू पेट्रा क्विटोव्हाने आठ वर्षानंतर फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. दोन वेळा विम्बल्डन चॅम्पियन क्विटोव्हाने एक तास 27 मिनिटे चाललेल्या सामन्यात चीनच्या झांग शुहाईचा 6-2, 6–4 ने पराभव केला. यापूर्वी सातव्या मानांकित क्विटोव्हाने 2012 मध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. क्विटोव्हाने अद्याप स्पर्धेत एकही सेट गमावला नाही. जेव्हा झांग पहिल्या सेटमध्ये 2-5 ने पिछाडीवर होती तेव्हा तिने वैद्यकीय कारणासाठी टाइम आऊट घेतला होता. क्विटोव्हाने थंड वातावरणापासून बचावासाठी गुलाबी कोट घातला होता.
लॉरा प्रथमच ग्रँड स्लॅमच्या अंतिम आठमध्ये
तीस वर्षांच्या क्विटोव्हाचा पुढील फेरीत जर्मनीच्या लॉरा सीगमंडशी सामना होईल. लॉराने स्पेनच्या पॉला बडोसाचा 7-5, 6-2 ने पराभव करून प्रथमच ग्रँड स्लॅमच्या अंतिम आठमध्ये प्रवेश केला.
जोकोविचने 14 व्या वेळी उपांत्यपूर्व फेरीत केला प्रवेश
जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या नोव्हाक जोकोविचने दोन तास 23 मिनिट चाललेल्या सामन्यात रुसच्या कारेन खाचानोवचा 6-4, 6-3, 6-3 ने पराभव करून सलग 11 वेळा आणि एकूण 14 वेळा उपांत्यपूर्व फेरी गाठली. सर्बियाच्या या टेनिसपटूने रविवारी पॅरिसमध्ये ही कामगिरी करत सर्वाधिक वेळा अंतिम आठची फेरी गाठण्याच्या स्पेनच्या राफेल नडालच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. जोकोविचने सलग दुसऱ्यांदा एकही सेट न गमावता पाचव्या फेरीत प्रवेश केला. या हंगामातील 36 सामन्यांत 33 वर्षीय जोकोविचचा हा 35 वा विजय आहे.
रुबलेवची टक्कर होईल सीतसिपासशी
जागतिक क्रमवारीत 12 व्या क्रमांकावर असलेल्या आंद्रे रुबलेवने हंगेरीच्या मार्टिन फ्यूकोव्हिक्सचा 6-7, 7-5, 6-4, 7-6, ने पराभूत करून फ्रेंच ओपनमध्ये पहिल्यांदा व ग्रँडस्लॅम मध्ये सलग दुसऱ्यांदा अंतिम आठमध्ये प्रवेश केला आहे. रुबलेवने यूएस ओपनमध्येही अंतिम आठमध्ये स्थान मिळविले होते. हा सामना चार तास चालला होता. त्याचा हा सलग नववा विजय आहे तर या हंगामातील 35 सामन्यांमधील त्याचा हा 29 वा विजय आहे. रुबलेवचा सामना ग्रीसच्या स्टेफानोस सीतसिपासशी होईल. सितसिपासने बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोव्हला 6-3, 7-6, 6-2 ने पराभूत करून प्रथमच फ्रेंच ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत प्रवेश केला.