भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ देशांतर्गत क्रिकेटमध्ये तुफान फटकेबाजी करत आहे. त्याने शुक्रवारी (दि. 14 ऑक्टोबर) सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत जबरदस्त फलंदाजी केली. यावेळी खेळताना त्याने 61 चेंडूत 134 धावांची विस्फोटक खेळी केली. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे, पण तरीही त्याला राष्ट्रीय संघात स्थान मिळत नाहीये.
दहा सामन्यात 875 धावा
पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याने मागील 10 सामन्यात फलंदाजी करताना तब्बल 875 धावा चोपल्या आहेत. या धावा करताना त्याने 3 शतके आणि 5 अर्धशतके झळकावली आहेत. या शानदार प्रदर्शनानंतरही त्याला भारतीय संघात संधी मिळत नसल्याने सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.
मुंबईचा आसामवर 61 धावांनी विजय
शुक्रवारी मुंबई संघाकडून खेळताना पृथ्वी शॉ याने 61 चेंडूत 134 धावांची अविश्वसनीय खेळी केली. या धावा करताना त्याने 9 षटकार आणि 13 चौकार मारले. त्याच्या या खेळीच्या जोरावर मुंबई संघाने हा आसाम संघाला विजयासाठी 231 धावांचे आव्हान दिले. आव्हानाचा पाठलाग करताना आसाम संघाचा डाव 169 धावांवर संपुष्टात आला. अशाप्रकारे 61 धावांनी मुंबईने हा सामना आपल्या नावावर केला.
https://twitter.com/BCCIdomestic/status/1580888086887612417
काही दिवसांपूर्वी शॉने राष्ट्रीय संघात निवड न झाल्याने दु:ख व्यक्त केले होते. तो म्हणाला होता की, “मी धावा करतोय आणि खूप मेहनत घेत आहे. मात्र, तरीही मला संधी मिळत नाहीये.” यावेळी तो म्हणाला होता की, “मला अपेक्षा आहे की, जेव्हा निवडकर्त्यांना वाटेल की, मी तयार आहे, तेव्हा ते मला संघात घेतील. मी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल.”
पृथ्वी शॉ याने यापूर्वी दुलीप ट्रॉफीमध्ये पश्चिम विभागासाठी खेळताना एक अर्धशतक आणि दोन शतके झळकावली होती. याव्यतिरिक्त त्याने रणजी सामन्यातही दोन अर्धशतके केली. न्यूझीलंड अ संघाविरुद्धच्या सामन्यात शॉची बॅट चांगलीच तळपली आणि त्याने 77 धावांची वादळी खेळी खेळली होती. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2022मधील 3 सामन्यात त्याने एक अर्धशतक आणि एक शतक मारले आहे. तीन सामन्यात त्याने 200हून अधिक धावा चोपल्या आहेत.
पृथ्वी शॉची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
याव्यतिरिक्त 22 वर्षीय शॉने भारतीय संघाकडून 5 कसोटी सामने, 6 वनडे सामने आणि 1 टी20 सामना खेळला आहे. 5 सामन्यात त्याने 1 शतक आणि 2 अर्धशतके झळकावत 339 धावा केल्या आहेत. तसेच, वनडेत त्याने 189 धावा केल्या आहेत. मात्र, त्याला टी20त एकही धाव करता आली नव्हती. त्याने जुलै 2021मध्ये भारतीय संघासाठी शेवटचा सामना खेळला होता. तो आता एक वर्षाहून अधिक काळापासून भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करत आहे.
पृथ्वी शॉच्या आयपीएल कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आयपीएलमध्ये 63 सामन्यात 1588 धावा केल्या आहेत.
पृथ्वी शॉचे मागील 10 सामन्यातील प्रदर्शन
134 धावा- मुंबई विरुद्ध आसाम
29 धावा- मुंबई विरुद्ध मध्यप्रदेश
55 धावा- मुंबई विरुद्ध मिजोरम
77 धावा- इंडिया ए विरुद्ध न्यूझीलंड ए
17 धावा- इंडिया ए विरुद्ध न्यूझीलंड ए
60 धावा आणि 142 धावा- वेस्ट जोन विरुद्ध सेंट्रल झोन
113 धावा- वेस्ट जोन विरुद्ध नार्थ ईस्ट झोन
47 धावा आणि 44 धावा- मुंबई विरुद्ध मध्य प्रदेश
0 धावा आणि 64 धावा- मुंबई विरुद्ध उत्तर प्रदेश
21 धावा आणि 72 धावा- मुंबई विरुद्ध उत्तराखंड
सातत्याने होतोय दुर्लक्षित
इतक्या दमदार कामगिरीनंतरही पृथ्वी शॉ याला दुर्लक्षित केले जात आहे. हा युवा खेळाडू त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. तो वेगाने धावा करतो. असे म्हटले जाते की, त्याच्यामध्ये विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग आणि दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर यांची झलक दिसते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बेन स्टोक्स! शॉट मारून हिरोगिरी करायला निघालेला ऑलराऊंडर धपकन आपटला, व्हिडिओ पाहाच
इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत दाखवून दिला आपला दम, ‘कॅप्टन’ बटलर मालिकावीर