भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हिने कोरिया ओपन सुपर सिरीजची उपउपांत्यफेरी गाठली. तिने थायलंडच्या नितचोन जिंदापोल हीचा २२-२०,२१-१७ असा सरळ सेटमध्ये पराभव केला.
जागतिक मानांकन यादीत चौथ्या स्थानावर असणाऱ्या सिंधूला पहिल्या सेटमध्ये १६ व्या मानांकित नितचोन जिंदापोलच्या कडव्या आव्हानाला सामोरे जावे लागले होते. सिंधूवर जिंदापोल प्रथमता ९-७ अशी बढत मिळवली होती. त्यानंतर तिने ही बढत १३-१० अशी वाढवली. त्यानंतर सिंधूने सलग सहा गुण मिळवत जिंदापोलची बढत १६-१४ अशी मोडीत काढली. ट्रायब्रेकरमध्ये गेलेला हा सेट सिंधूने २२-२० असा जिंकला.
दुसऱ्या सेटमध्ये देखील दोन्ही खेळाडूंमध्ये गुणांसाठी चुरस पाहायला मिळाली. सुरुवातीला दोन्ही खेळाडू ८-८ असे बरोबरीत होते. त्यानंतर सिंधूने या सामन्यात १२-९ अशी बढत मिळवली. सेटमध्ये पुनरागमन करत जिंदापोलने दुसरा सेट १५-१५ असा बरोबरीत आणून ठेवला. विरोधी खेळाडूला जास्त संधी न देता सिंधूने हा सेट २१-१७ असा जिंकत सामना आपल्या नावे केला.
या सामन्याअगोदर हया दोन्ही महिला खेळाडू मागील वर्षी सईद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत एकमेकांसमोर आल्या होत्या. या सामन्यात सिंधूला पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात विजय मिळवत तिने त्या पराभवाची परतफेड केली. सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना जपानच्या मिनात्सू मितानी हिच्याशी होणार आहे. जपानच्या या महिला खेळाडूने २०१४ साली बॅडमिंटन चॅम्पियनशीपमध्ये कांस्य पदक पटकावले होते. त्याचबरोबर जपानच्या या खेळाडूने २०१२ साली साईना नेहवालला फ्रेंच ओपनच्या अंतिमफेरीत हरवत ती स्पर्धा जिंकली होती.