सध्या सुरु असलेल्या दुबई वर्ल्ड सुपर सिरीज फायनलमध्ये भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूचा आजचा सामना जपानच्या अकाने यामागूची विरुद्ध होणार आहे.
या स्पर्धेमध्ये पी.व्ही.सिंधू अ गटातून खेळत असून तिने मागील दोन्हीही सामने जिंकलेले आहेत. तिचा पहिला सामना चीनच्या ही बिंगजियाओ विरुद्ध झाला. या सामन्यात सिंधूने विजय मिळवून स्पर्धेची विजयी सुरुवात केली होती.
सिंधूचा दुसरा सामना सायको साटोविरुद्ध झाला. हा सामना देखील सिंधूने सहज जिंकला होता. या दोन विजयामुळे तिने उपांत्य सामन्यातील प्रवेश जवळ जवळ निश्चित केला आहे.
सिंधू या स्पर्धेत अ गटातून खेळत आहे. तिचा या गटातील शेवटचा साखळी सामाना यामागूचीविरुद्ध होणार असून जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या यामागूचीने पहिल्या सामन्यात सायको साटोला तर दुसऱ्या सामन्यात बिंगजियाओला पराभूत केले आहे.
त्यामुळे सिंधू आणि यामागूची या दोघींमध्ये अ गटात अव्वल स्थानी राहण्यासाठी आज स्पर्धा असेल. हा सामना संध्याकाळी ६ वाजता सुरु होण्याची शक्यता आहे.