गुरुवारपासून (दि. 06 जुलै) लीड्स येथील हेडिंग्ले मैदानावर इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ऍशेस 2023 मालिकेतील तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने जबरदस्त पराक्रम गाजवला आहे. त्याने लीड्स कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर याला बाद करत एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. अशी कामगिरी करत तो एका फलंदाजाला सर्वाधिक वेळा बाद करणारा गोलंदाज ठरला आहे.
स्टुअर्ट ब्रॉडने रचला इतिहास
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) याने डेविड वॉर्नर (David Warner) याला बाद करत इतिहास रचला आहे. त्याने वॉर्नरला 16 वेळा बाद करत वेस्ट इंडिजचे दिग्गज माल्कम मार्शल यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे, ज्यांनी इंग्लंडचे दिग्गज ग्रॅहम कूच यांना कसोटीत 16 वेळा बाद केले होते. कसोटीत कोणत्याही फलंदाजाला सर्वाधिक वेळा बाद करण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलदाज ग्लेन मॅकग्रा याच्या नावावर आहे. त्याने 34 कसोटी डावात 19 वेळा इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल एथर्टन याला तंबूचा रस्ता दाखवत हा विक्रम आपल्या नावावर केला.
ब्रॉडने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा बाद केलेल्या खेळाडूंची यादी पाहिली, तर पहिल्या क्रमांकावर वॉर्नरचे नाव आहे. त्यानंतर या यादीत दुसऱ्या स्थानी मायकल क्लार्क (Michael Clarke) आहे. त्याला ब्रॉडने कसोटीत 11 वेळा बाद केले आहे. तिसऱ्या क्रमांकावर रॉस टेलर (Ross Taylor) असून तो 10 कसोटी डावांमध्ये ब्रॉडची शिकार बनला होता. चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर अनुक्रमे एबी डिविलियर्स (AB de Villiers) आणि टॉम लॅथम (Tom Latham) आहेत. या दोघांनीही 10 कसोटी डावांमध्ये ब्रॉडच्या चेंडूवर विकेट गमावली आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये स्टुअर्ट ब्रॉडविरुद्ध सर्वाधिक वेळा विकेट गमावणारे क्रिकेटपटू
16 – डेविड वॉर्नर*
11 – मायकल क्लार्क
10 – रॉस टेलर
10 – एबी डिविलियर्स
10 – टॉम लॅथम
ऑस्ट्रेलिया मालिकेत 2-0ने आघाडीवर
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात लीड्सच्या ऐतिहासिक हेडिंग्ले मैदानावर तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाची सुरुवात खूपच खराब राहिली. संघाने 100 धावांच्या आतच चार विकेट्स गमावल्या. दुसरीकडे, हा स्टीव्ह स्मिथ याचा 100वा कसोटी सामना आहे. यामध्ये स्मिथ खास कामगिरी करू शकला नाही. तो 31 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकार मारून फक्त 22 धावा करून तंबूत परतला.
मात्र, मालिकेत ऑस्ट्रेलिया संघ 2-0ने आघाडीवर आहे. अशात इंग्लंडसाठी या सामन्यात ‘करो वा मरो’ अशी स्थिती झाली आहे. (pacer stuart broad dismiss david warner in third ashes test at leeds and create new record)
महत्वाच्या बातम्या-
सामन्यातील असामान्य नेतृत्व! जबरदस्त आहे कसोटी, वनडे आणि टी-20 क्रिकेटमधील धोनीची आकडेवारी
धोनीचे 10 विक्रम, जे आजही आहेत अबाधित; मोडणे अवघड नाही, तर अशक्यच!