सध्या भारतीय क्रिकेट संघाचे वेळापत्रक अत्यंत व्यस्त आहे. आयपीएलपासून भारतीय संघ सातत्याने खेळतोय. काही खेळाडूंना विश्रांती देत युवा खेळाडूंना संधी दिली जात आहे. त्याचवेळी यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये टी२० विश्वचषक खेळला जाणार आहे. या विश्वचषकासाठी भारतीय मदत व्हावी म्हणून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) एक निर्णय घेतला आहे. दक्षिण आफ्रिकेचे प्रसिद्ध मेंटल कंडिशनिंग कोच पॅडी अप्टन यांची विश्वचषकापर्यंत भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.
बीसीसीआय अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले की,
“यावर्षी होणाऱ्या टी२० विश्वचषकापर्यंत पॅडी अप्टन यांना भारतीय संघासह जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ते मेंटल कंडिशनिंग कोच या पदावर राहतील. खेळाडूंना व्यस्त वेळापत्रक मानसिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांची निवड केली गेली आहे.”
पॅडी अप्टन हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील मोठे नाव म्हणून ओळखले जाते. दक्षिण आफ्रिकेचे रहिवासी असलेल्या अप्टन यांनी यापूर्वी देखील भारतीय संघासह काम केले आहे. गॅरी कस्टर्न भारतीय संघाचे प्रशिक्षक असताना अप्टन सहप्रशिक्षक म्हणून संघासोबत होते. भारतीय संघाने जिंकलेल्या २०११ विश्वचषकावेळी ते सपोर्ट स्टाफचा भाग होते. त्याचवेळी सध्या भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक असलेल्या राहुल द्रविड यांच्यासोबतही त्यांनी बराच काळ काम केले आहे. आयपीएलमध्ये त्यांनी राजस्थान रॉयल्स व दिल्ली डेअरडेविल्स संघासाठी प्रशिक्षक म्हणून काम केले आहे.
पॅडी अप्टन यांनी १९९४ मध्ये कंडिशनिंग कोच म्हणून कारकीर्द सुरू केली होती. दिवंगत दिग्गज क्रिकेट प्रशिक्षक बॉब वूल्मर यांनी त्यांना संधी दिली होती. पुढे त्यांनी अनेक संघासाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून देखील काम केले. नुकतेच आयपीएलमध्ये ते राजस्थान रॉयल्सचे सल्लागार म्हणून दिसले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
श्रेयस अय्यरबद्दल ‘ती’ कमेंट करणे न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूच्या अंगाशी, सारखा वाजतोय फोन!
ब्रेकिंग! भारताच्या सुवर्ण आशांना सुरुंग! ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राची कॉमनवेल्थमधून माघार
‘त्यावेळी मी कारगिल युद्ध लढायला निघालेलो’, शोएब अख्तरने केले बेताल विधान