भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांचे वितरण भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सोमवारी (८ नोव्हेंबर) करण्यात आले. यंदा हे पुरस्कार दोन वर्षांसाठी दिले जात आहेत. यामध्ये २०२० आणि २०२१ च्या पुरस्कारांचा समावेश आहे. त्यामध्ये क्रीडाक्षेत्रातील व्यक्तींनाही पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एकूण आठ क्रीडा व्यक्तिमत्त्वांना पद्म पुरस्कार देण्यात आले आहेत. या सोहळ्यात सन्मानित करण्यात आलेल्या आठ जणांविषयी आपण जाणून घेणार आहोत.
१) मेरी कोम-
जगातील सर्वात यशस्वी महिला बॉक्सरमध्ये गणली जाणारी मेरी कोम हिला पद्मविभूषण २०२० पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मेरी कोमने लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते. याशिवाय तिने पाच वेळा जागतिक स्पर्धेत सुवर्ण पदक तसेच एक रौप्य आणि कांस्य पदक जिंकले आहे.
२) पीव्ही सिंधू-
यावेळी टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणारी भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिला पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सिंधूने रिओ ऑलिम्पिक २०१६ मध्येही रौप्य पदक जिंकले होते. एकेरी स्पर्धेत भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारी ती पहिली महिला आणि एकूण दुसरी खेळाडू आहे.
३) झहीर खान-
भारताचा माजी क्रिकेटपटू झहीर खानला पद्मश्री पुरस्कार २०२० ने सन्मानित करण्यात आले. झहीर खानची गणना भारताच्या सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये केली जाते. २०११ चा विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा तो भाग आहे.
४) बेमबेम देवी-
मणिपूरची फुटबॉलपटू ओइनम बेमबेम देवी हिला पद्मश्री पुरस्कार २०२० ने सन्मानित करण्यात आले आहे. भारतीय महिला फुटबॉलला एका नव्या उंचीवर नेण्यात बेमबेम देवीने महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे.
५) एमपी गणेश-
भारताचे माजी हॉकीपटू एम पी गणेश यांनाही पद्मश्री पुरस्कार २०२० ने सन्मानित करण्यात आले आहे. १९७२ म्युनिक ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा गणेश एक भाग होते.
६) जितू राय-
भारतातील सर्वोत्कृष्ट नेमबाजांपैकी एक असलेल्या जितू राय यांना पद्मश्री पुरस्कार २०२० ने सन्मानित करण्यात आले आहे. जितूने २०७ आणि २०१८ मध्ये सुवर्णपदक जिंकले होते. याशिवाय २०१४ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने सुवर्ण आणि कांस्यपदक जिंकले आहे.
७) तरूणदीप राय-
भारतीय तिरंदाज तरुणदीप राय यालाही पद्मश्री पुरस्कार २०२० ने सन्मानित करण्यात आले आहे. तरुणदीप रायनेही देशासाठी चांगले यश मिळवलेले. आशियाई खेळ २००६ मध्ये त्याने कांस्यपदक जिंकले. या खेळांमध्ये सांघिक प्रकारात रौप्य पदक जिंकण्यात त्याला यश आले.
८) राणी रामपाल-
पद्मश्री पुरस्कार २०२० ने सन्मानित करण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये भारतीय महिला हॉकीपटू राणी रामपालचाही समावेश आहे. राणीच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक यश मिळवले आहेत. तिच्या नेतृत्वाखाली यंदा भारतीय महिला हॉकी संघ प्रथमच ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरी गाठण्यात यशस्वी ठरला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
‘नामिबियाबरोबरचा सामना खेळणे गरजेचे आहे का?’, भारताच्या अखेरच्या सामन्यापूर्वी मीम्सचा सुळसूळाट
यूएईत पाकिस्तान संघ ‘किंग’!! १६ सामने अन् ८ बलाढ्य संघांना पराभूत करत राहिलाय अजेय
तब्बल २४ वर्षांनंतर पाकिस्तान दौ-यावर जाणार ऑस्ट्रेलिया; ‘या’ दिवशी होणार मालिकेला प्रारंभ