पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मंगळवारी (५ एप्रिल) लाहोरच्या गदाफी स्टेडियमवर टी२० सामना पार पडला. कर्णधार ऍरोन फिंचच्या अर्धशतकीय खेळी आणि गोलंदाज नॅथन एलिसच्या ४ विकेट्सच्या आधारावर ऑस्ट्रेलियाने हा सामना तीन विकेट्सने जिंकला. पाकिस्तानने टी२० मध्ये पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ८ विकेट्स गमावत १६२ धावा केल्या. प्रत्युतरात ऑस्ट्रेलियाने ५ चेंडू राखून हे लक्ष्य गाठले.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम पुन्हा एकदा शानदार खेळी खेळताना दिसला. त्याने ४६ चेंडूत ६६ धावा केल्या, यामध्ये ६ चौकारांचा आणि दोन षटकारांचा समावेश आहे. तसेच संघाकडून मोहम्मद रिझवानने २६ धावांची खेळी खेळली. संघाने २० षटकात चांगली धावसंख्या केली. पाकिस्तानकडून बाबर आणि रिझवानने संघाला चांगली सुरुवात करुन दिली होती. रिझवान बाद झाल्यानंतर पाकिस्तानच्या एका पाठोपाठ विकेट गेल्या. खुशदिल आणि उस्मान कादिरने शेवटच्या षटकांमध्ये मोठी धावसंख्या करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन एलिसने ४ षटकात २८ धावा देत ४ विकेट घेतल्या.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरोन फिंचने १३ टी२० नंतर आपले शानदार अर्धशतक लगावले. ट्रेविस हेड आणि फिंच या सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी ४० धावांचा भागिदारी केली. हेडने १४ चेंडूत २६ धावा केल्या. जोश इंग्लिसने १५ चेंडूत २४ धावा केल्या. लॅब्युशेनने २ धावा केल्या. मार्कस स्टॉयनिसने ९ चेंडूत २३ धावा केल्या.
शाहिन आफ्रिदीने १९ व्या षटकात फिंच आणि एबाॅचची विकेट घेतली. पण बेन मॅकडेमाॅर्टने १९ चेंडूत २२ धावा करत ऑस्ट्रेलियासाठी विजयी चौकार लगावला. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानविरुद्ध सलग चौथ्या टी२० मध्ये विजय मिळवला आहे.
दरम्यान, ऑस्ट्रेलिया संघ २४ वर्षानंतर पाकिस्तान दौऱ्यावर होता. या दोन संघांमध्ये ३ सामन्यांची कसोटी मालिका पार पडली, जी ऑस्ट्रेलियाने १-० ने जिंकली. यानंतर ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २-१ ने विजय मिळवला आणि ऑस्ट्रेलियाने एक टी२० आपल्या नावावर केली आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘सामना कधी हातातून निसटला कळलंच नाही’, आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर सॅमसनची कबुली
‘क्रिकेटमधून विश्रांती घेण्याची वेळ आली नाही’, कार्तिकने सांगितले आयपीएल २०२२मधील यशाचे कारण