इंग्लंडविरुद्ध मुलतान येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव झाला. या सामन्यात पाकिस्तानचा संघ पहिल्या इनिंगमध्ये 556 धावा करूनही डावानं पराभूत झाला. इंग्लंडनं त्यांचा एक डाव आणि 47 धावांनी पराभव केला आहे.
इंग्लंडसाठी दुसऱ्या डावात जॅक लीचनं 4 बळी घेत पाकिस्तानचं कंबरडं मोडलं. पाकिस्तानचा दुसरा डाव अवघ्या 220 धावांवर आटोपला. स्टार फलंदाज बाबर आझम दुसऱ्या डावातही अपयशी ठरला आहे. त्यानं पहिल्या डावात 30 धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या डावात तो फक्त 5 धावा करून बाद झाला.
या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्ताननं पहिल्या डावात 556 धावा केल्या, ज्यात कर्णधार शान मसूद, अब्दुल्ला शफीक आणि आगा सलमान यांच्या शतकी खेळींचा समावेश होता. मात्र इंग्लंडनं आपल्या पहिल्या डावात असा जोरदार कमबॅक कला, ज्याची यजमान संघाला कल्पनाही नव्हती!
या सामन्यात हॅरी ब्रूक आणि जो रुट यांनी धमाकेदार फलंदाजी केली. या दोघांमध्ये 454 धावांची ऐतिहासिक भागिदारी झाली. रुटनं आपला जोरदार फॉर्म कायम ठेवत द्विशतक ठोकलं. तो 262 धावा करून बाद झाला. तर हॅरी ब्रूकनं करिअरचं पहिलं त्रिशतक ठोकलं. त्यानं 317 धावा केल्या. या दोघांच्या फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडनं आपल्या पहिल्या डावात 823 धावा करत 267 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या इनिंगमध्ये डावानं पराभव वाचवण्यासाठी पाकिस्तानला 268 धावांची आवश्यकता होती. मात्र संघ 220 धावांवर ऑलआऊट झाला. अशाप्रकारे इंग्लंडनं हा सामना एक डाव आणि 47 धावांनी जिंकून इतिहास रचला.
क्रिकेटच्या इतिहासातील पहिला कसोटी सामना 1877 मध्ये खेळण्यात आला होता. तेव्हापासून 147 वर्षांच्या इतिहासात पाकिस्तान पहिल्या इनिंगमध्ये 500 पेक्षा अधिक धावा करून डावानं पराभूत होणारा पहिला संघ ठरला आहे.
हेही वाचा –
‘आम्हाला भीती नाही…’, भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी न्यूझीलंडच्या कर्णधाराने रणशिंग फुंकला…
झुडपांमध्ये चेंडू हरवला, शोधताशोधता दिग्गज खेळाडूची धडपड; पाहा मजेशीर VIDEO
कर्णधार रोहित शर्माने मोठ्या भावाचे कर्तव्य पार पाडले; जखमी मुशीर खानची घेतली भेट