सध्या पाकिस्तानचा क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. तेथे उभय संघामध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर पाकिस्ताननं दुसऱ्या सामन्यात जोरदार पुनरामगन करत ऑस्ट्रेलियाचा 9 गडी राखून पराभव केला. विशेष म्हणजे, पाकिस्ताननं हा सामना एकतर्फी जिंकला. सामन्यात असा एकही क्षण आला नाही, जेव्हा असं वाटलं की ऑस्ट्रेलिया आघाडीवर आहे. पाकिस्तानकडून धावांचा पाठलाग करताना सॅम अयुबनं 82 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली. तर हारिस रौफनं 5 बळी घेतले.
नाणेफेक जिंकल्यानंतर पाकिस्ताननं गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय त्यांच्यासाठी खूप फायद्याचा ठरला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या यजमान ऑस्ट्रेलियाचा संघ 35 षटकांत अवघ्या 163 धावांत गारद झाला. स्टीव्ह स्मिथनं कांगारुंसाठी सर्वात मोठी खेळी खेळली. त्यानं 5 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं 48 चेंडू 35 धावा केल्या.
पाकिस्तानकडून हरिस रौफनं सर्वाधिक 5 बळी घेतले. याशिवाय शाहीन आफ्रिदीनं 3 विकेट्स घेतल्या. उर्वरित 1-1 विकेट नसीम शाह आणि मोहम्मद हसनैन यांनी घेतली. रौफनं आपल्या 8 षटकांत केवळ 29 धावा दिल्या. या चमकदार कामगिरीसाठी त्याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा खिताब देण्यात आला.
ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानसमोर विजयासाठी 50 षटकांत 164 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. पाकिस्ताननं 26.3 षटकांत 169/1 धावा करून हे लक्ष्य सहज गाठलं. संघासाठी सॅम अयुब आणि अब्दुल्ला शफीक यांनी पहिल्या विकेटसाठी 123 चेंडूत 137 धावांची भागीदारी केली. पाकिस्तानला पहिला धक्का 21व्या षटकात बसला, जेव्हा अयुब 71 चेंडूत 5 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीनं 82 धावा करून बाद झाला.
त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी अब्दुल्ला शफीक आणि बाबर आझम यांनी 32 (37) धावांची नाबाद भागीदारी करून संघाला विजय मिळवून दिला. शफीकनं 69 चेंडूंत 4 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीनं 64 धावा केल्या. तर बाबरनं 20 चेंडूत 1 षटकाराच्या मदतीनं 15 धावा केल्या.
हेही वाचा –
केएल राहुलचं हसं, खूपच विचित्र पद्धतीनं बाद; चाहत्यांना केली थेट बाबर आझमशी तुलना; VIDEO पाहा
रणजी ट्रॉफी खेळून फायदा काय? 6000 धावा आणि 400 विकेट घेणाऱ्या खेळाडूची टीम इंडियात निवड नाही!
दोन खेळाडू आज पदार्पण करणार? दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अशी असू शकते भारताची प्लेइंग 11