पाकिस्तान क्रिकेट संघाला अखेर घरच्या मैदानावर कसोटी विजयाची चव चाखायला मिळाली आहे. पाकिस्ताननं मुलतान येथे खेळल्या गेलेल्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 152 धावांनी विजय मिळवला. या विजयासह संघानं मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.
पाकिस्तानचा संघ दीर्घकाळापासून घरच्या मैदानावर कसोटी सामना जिंकण्यात अपयशी ठरत होता. गेल्या महिन्यात बांगलादेशनं त्यांना त्यांच्याच भूमीवर कसोटी मालिकेत 2-0 ने क्लीन स्वीप केले होते. मागील 12 मायदेशातील कसोटी सामन्यांमध्ये पाकिस्तानचा हा पहिला विजय आहे. यापूर्वी पाकिस्ताननं घरच्या मैदानावर शेवटचा कसोटी सामना तब्बल 1338 दिवसांपूर्वी जिंकला होता.
या सामन्यात इंग्लंडला विजयासाठी 297 धावांचं लक्ष्य मिळालं होतं. प्रत्युत्तरात, ते दुसऱ्या डावात अवघ्या 144 धावांवर गारद झाले. पाकिस्तानकडून नोमान अलीनं दुसऱ्या डावात 8, तर साजिद खाननं 2 बळी घेतले. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स 36 चेंडूत 44 धावा करून बाद झाला. त्याच्या विकेटसह इंग्लंडच्या उरलेल्या आशाही संपुष्टात आल्या.
पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदनं दुसऱ्या डावात केवळ दोन गोलंदाजांचा वापर केला. साजिद खान आणि नोमान अली यांच्या फिरकीपुढे इंग्लिश फलंदाज झुंजताना दिसले. या संपूर्ण सामन्यात पाकिस्तानच्या एकाही वेगवान गोलंदाजानं दोन्ही डावात एकही विकेट घेतली नाही. पहिल्या डावात साजिद खाननं 7 आणि नोमाननं 3 गडी बाद केले होते.
पाकिस्तान दुसऱ्या डावात 221 धावांवर ऑलआऊट झाला होता. आघा सलमाननं सर्वाधिक 63 धावा केल्या. इंग्लंडकडून शोएब बशीरनं 4 तर जॅक लीचनं 3 बळी घेतले. इंग्लंडनं पहिल्या डावात 291 धावा केल्या होत्या. बेन डकेटनं 114 धावांची खेळी खेळली. पण या दोघांशिवाय एकही इंग्लिश फलंदाज जास्त वेळ क्रीझवर टिकू शकला नाही.
या सामन्यात बाबर आझमच्या जागी संघात आलेल्या कामरान गुलामनं शानदार शतक झळकावलं. तर सॅम अयुबनं 77 धावांची खेळी केली. पाकिस्ताननं पहिल्या डावात 366 धावा केल्या होत्या. इंग्लंडतर्फे जॅक लीचनं 4, तर ब्रायडन कार्सनं 3 बळी घेतले.
हेही वाचा –
भारत-न्यूझीलंड कसोटीत रवींद्रनं ठोकलं शतक, 12 वर्षांनंतर झाला हा पराक्रम!
टीम इंडियाच्या अपयशानंतर अजिंक्य रहाणेची पोस्ट व्हायरल, व्हिडिओ टाकून म्हणाला…
टी20 विश्वचषकातील सर्वात मोठा अपसेट, 15 वर्षात असं पहिल्यांदाच घडलं!