भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यान आशिया चषक 2022 मधील सुपर फोर सामना खेळला गेला. दुबई येथे झालेल्या सुपर फोरमधील या थरारक सामन्यात पाकिस्तानने एका आठवड्यात आपल्या पराभवाचा बदला घेत भारतीय संघाला पराभूत करत अंतिम फेरीच्या दिशेने मोठे पाऊल टाकले. मोहम्मद रिझवानचे अर्धशतक व इतर फलंदाजांच्या उपयुक्त योगदानाच्या जोरावर पाकिस्तानने भारताचा 5 गडी राखून पराभव केला.
ASIA CUP 2022. Pakistan Won by 5 Wicket(s) https://t.co/Yn2xZGToSl #INDvPAK #AsiaCup2022
— BCCI (@BCCI) September 4, 2022
दोन्ही संघ सुपर फोर फेरीतील आपला हा पहिला सामना खेळत होते. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला फलंदाजीसाठी पाचारण केले. भारतीय संघासाठी रोहित शर्मा व केएल राहुल यांनी वेगवान फलंदाजी करताना पावर प्लेमध्येच 54 धावा काढल्या. दोघेही प्रत्येकी 28 धावा काढून माघारी परतले. त्यानंतर आलेला सूर्यकुमार यादव 13 धावांच्या पुढे जाऊ शकला नाही. त्यानंतर रिषभ पंत पुन्हा एकदा अपयशी ठरला. भारताकडून एकटा विराट कोहली अर्धशतकी खेळी करू शकला. त्याने सर्वाधिक 60 धावा केल्या. निर्धारित 20 षटकात भारतीय संघ 7 बाद 181 धावा करू शकला.
या धावांचे प्रत्युत्तर देण्यासाठी उतरलेल्या पाकिस्तानला बाबर आझमच्या रूपाने लवकर धक्का बसला. मात्र, मोहम्मद रिझवान व फखर झमान या अनुभवी खेळाडूंनी जबाबदारी घेत धावांचा वेग जास्त कमी होऊ दिला नाही. फखर बाद झाल्यानंतर पाकिस्तानी मोठा डाव खेळत मोहम्मद नवाझला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले. त्याने केवळ 20 चेंडूवर 42 धावांची तुफानी केळी करत सामना पाकिस्तानच्या दिशेने नेला. 71 धावा करून रिझवान बाद झाल्यानंतर सामना काहीसा भारताच्या बाजूने आला होता. मात्र, अर्शदीप सिंगने मोक्याच्या क्षणी आसिफ अलीचा झेल सोडला. 19 व्या षटकात भुवनेश्वर कुमार चांगलाच महागडा ठरल्याने पाकिस्तानच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. अखेरच्या षटकात अर्शदीपने सहा धावा वाचवण्यासाठी शर्थीच प्रयत्न केले मात्र त्याला अपयश आले.