टी20 विश्वचषक 2024 च्या 25 व्या सामन्यात भारतीय संघानं यजमान अमेरिकेचा 7 गडी राखून पराभव केला. या विजयासह टीम इंडिया सुपर-8 साठी पात्र ठरली आहे. मात्र भारताच्या या विजयाचा पाकिस्तानला मोठा फायदा झालाय. कारण संघाचा पुढच्या फेरीचा मार्ग थोडा सोपा झाला आहे.
वास्तविक, 2024 च्या टी-20 विश्वचषकात पाकिस्तानची कामगिरी म्हणावी तितकी चांगली राहिली नाही. संघानं आतापर्यंत एकूण 3 सामने खेळले, ज्यापैकी त्यांना केवळ एकच सामना जिंकता आला आहे. यामुळे पाकिस्तानला सुपर-8 मध्ये जाण्यासाठी इतर संघांवर अवलंबून राहावं लागत आहे.
या सामन्यात जर अमेरिकेनं भारताचा पराभव केला असता किंवा पावसामुळे सामना रद्द झाला असता, तर पाकिस्तानचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला असता. भारतीय संघ हरला असता तर अमेरिकेचे 6 गुण झाले असते आणि ते सुपर 8 साठी पात्र ठरले असते. तर भारतीय संघाकडे पुढील सामन्यात आयर्लंडला पराभूत करून सुपर 8 मध्ये जाण्याची संधी होती. दुसरीकडे, पाकिस्तान संघ सलग दोन सामने जिंकूनही केवळ 4 गुणांपर्यंतच पोहोचू शकला असता, ज्यामुळे त्यांचं विश्वचषकातून बाहेर पडणं निश्चित होतं.
मात्र, आता भारताच्या या विजयानं पाकिस्तानचा मार्ग सोपा झाला आहे. गुणतालिकेत सध्या अमेरिकेचे 3 सामन्यांत 4 गुण आहेत, तर पाकिस्तानचे 2 गुण आहेत. पाकिस्तानला त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात आयर्लंडचा पराभव करावाच लागेल. तसेच अपेक्षा करावी लागेल की, आयरिश संघानं अमेरिकेचा पराभव करावा. असं झाल्यास नेट रनरेटच्या आधारे पाकिस्तान सुपर-8 मध्ये जाईल.
भारताविरुद्धच्या पराभवानंतर अमेरिकेचा नेट रन रेट पाकिस्तानपेक्षा खाली गेला आहे. याचा फायदा पाकिस्तानला होऊ शकतो. दुसरीकडे, यजमान अमेरिकेच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांना सुपर 8 मध्ये प्रवेश करायचा असेल तर आयर्लंडला कोणत्याही परिस्थितीत पराभूत करावं लागेल.
महत्त्वाच्या बातम्या –
मोक्याच्या क्षणी सूर्या आला फॉर्ममध्ये! सर्व टीकाकारांची बोलती बंद
आयसीसी स्पर्धेत सर्वाधिक सामने जिंकणारे भारतीय कर्णधार, रोहित शर्मानं सौरव गांगुलीला टाकलं मागे!
सेमी फायनलपूर्वीच भारत-ऑस्ट्रेलिया येणार आमनेसामने! कसं ते समजून घ्या