इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही संघामध्ये ३ सामन्यांची वनडे मालिका पार पडली. या मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना मंगळवारी (१३ जुलै) पार पडला. या सामन्यात पाकिस्तान संघाला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. इंग्लंड संघाने तिसरा वनडे सामना ३ गडी राखून आपल्या नावावर केला आहे. इतकेच नव्हे तर, ही मालिका ३-० ने आपल्या नावावर केली आहे. पण असे असले तरी, पाकिस्तानसाठी आनंदाची बाब अशी की, कर्णधार बाबर आजम हा चांगल्या फॉर्ममध्ये परत आला आहे. त्याने तिसऱ्या वनडे सामन्यात दीडशतकी खेळीसह विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे.
बाबरची विक्रमी खेळी
या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पाकिस्तान संघाच्या सलामवीरांनी चांगली सुरुवात करून दिली होती. इमाम-उक-हकने ५६ धावांची खेळी केली तर, मोहम्मद रिजवानने ५४ धावांचे योगदान दिले.
तसेच पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आजम याने या सामन्यात गेल्या २ सामन्यातील खराब कामगिरीची कसर भरुन काढली. त्याने १३९ चेंडूत १४ चौस्के आणि ४ षटकारासह १५८ धावांची खेळी केली आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात बाबर आजम खातेही न खोलता माघारी परतला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्याला अवघ्या १९ धावा करण्यात यश आले होते. परंतु, तिसऱ्या सामन्यात तुफानी फटकेबाजी करून त्याने दाखवून दिले की, तो अव्वल दर्जाचा खेळाडू का आहे.
त्याने या सामन्यात एक पाकिस्तान संघाचा कर्णधार म्हणून वनडेत सर्वात मोठी खेळी खेळण्याचा विक्रम देखील आपल्या नावावर केला आहे. यापूर्वी हा विक्रम शोएब मलिकच्या नावे होता. मलिकने २००८ मध्ये भारतीय संघाविरुद्ध झालेल्या वनडे सामन्यात १२५ धावांची खेळी केली होती.
मंगळवारी पाकिस्तान संघाला ५० षटकाअखेर ९ बाद ३३१ धावा करण्यात यश आले होते. (Pakistan captain babar azam breaks many records in 3rd odi against England)
बाबरची एका मोठ्या विश्वविक्रमाला गवसणी
बाबर आजमने ८१ वनडे डावात १४ शतकं करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. हा पुरुष आणि महिला क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात १४ शतकं करण्याचा विश्वविक्रम आहे. ऑस्ट्रेलियन संघाची महिला फलंदाज मेग लेनिंग हिने ८२ डावात हा कारनामा केला होता. तर हाशिम आमलाने हा कारनामा ८४ डावात केला होता. यासह डेविड वॉर्नरने ९८ डावात आणि भारतीय कर्णधार विराट कोहलीने १०३ डावात १४ वे वनडे शतक पूर्ण केले होते.
तसेच बाबर आजम हा इंग्लंडमध्ये वनडे सामन्यांमध्ये तीन शतक झळकावणारा पाकिस्तानचा पहिला फलंदाज ठरला आहे. तसेच एक कर्णधार म्हणून इंग्लंडमध्ये शतक झळकावणारा तो दुसरा पाकिस्तानी कर्णधार ठरला आहे. यापूर्वी इम्रान खान यांनी कर्णधार म्हणून खेळताना इंग्लंडमध्ये वनडेत शतकी खेळी केली होती.
इंग्लंड संघाने मारली माजी
पाकिस्तान संघाने इंग्लंड संघाला विजय मिळवण्यासाठी ३३२ धावांचे आव्हान दिले होते. सर्वांना असे वाटत होते की हा सामना पाकिस्तान संघ जिंकेल. परंतु जेम्स विन्सीच्या फलंदाजीपुढे पाकिस्तान संघातील गोलंदाजांचा निभाव लागला नाही. इंग्लंड संघाकडून जेम्स विन्सीने सर्वाधिक १०२ धावांची खेळी केली. तर लुईस ग्रेगरीने ७७ धावांचे योगदान दिले. या सामन्यात इंग्लंड संघाने १२ चेंडू आणि ३ गडी राखून विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय क्रिकेटच्या ‘दादा’चा बोयपिक येणार भेटीला; ‘हे’ ६ अभिनेते साकारू शकतात गांगुलीची भूमिका
काय सांगता! विश्वचषकातील सुपर ओव्हरपूर्वी बेन स्टोक्स गेला होता सिगारेट प्यायला
मोठी बातमी! टेनिस स्टार रॉजर फेडररची टोकियो ऑलिम्पिकमधून माघार, ‘हे’ आहे कारण