वेस्ट इंडिजचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यात वेस्ट इंडिज संघाला पाकिस्तान संघाविरुद्ध ३ सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. यातील पहिला सामना बुधवारी (दि. ०८ जून) मुल्तान येथे खेळला गेला. तब्बल १४ वर्षांनंतर मुल्तान येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन झाले आहे. या सामन्यादरम्यान पाकिस्तानच्या खेळाडूने घेतलेल्या झेलची सर्वत्र चर्चा रंगली आहे. एवढेच नाही, तर या झेलाचा व्हिडिओही तुफान व्हायरल होत आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.
झाले असे की, या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी याने तिसऱ्या षटकात काईल मेयर्सचा शानदार झेल पकडत वेस्ट इंडिजला पहिला झटका दिला. यानंतर शाय होप आणि शामराह ब्रूक्स यांनी दुसऱ्या विकेटसाठी तब्बल १५४ धावांची भागीदारी रचली. ब्रूक्सला मोहम्मद नवाज याने ७० धावांच्या धावसंख्येवर बाद करत ही भागीदारी तोडली. ब्रूक्सच्या विकेटचे श्रेय शादाब खान याला जाते, ज्याने शॉर्ट थर्ड मॅनवर अफलातून झेल घेत सर्वांच्याच भुवया उंचावल्या.