मुंबई । इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी पाकिस्तानच्या संघासाठी वाईट बातमी समोर आली आहे. पाकिस्तानच्या तीन खेळाडूंना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तीन खेळाडूंना कोरोनाची लागण होताच पीसीबीचे धाबे दणाणले आहे. हैदर अली, हरिश राउफ आणि शादाब खान या तिघांचा कोरोना अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
हे तीन खेळाडू रविवारी 29 सदस्यीय संघासोबत इंग्लंडला रवाना होणार होते. पण, आता त्यांचे जाणे मुश्किल झाले आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, रावळपिंडी येथे तिन्ही खेळाडूंचे टेस्ट करण्यात आली. त्यावेळी या तीन खेळाडूंना कोणतेच लक्षण दिसून आले नाही. शादाब खान, हैदर अली, हॅरिस राउफ यांची इंग्लंडविरुद्ध होणार्या 3 टी 20 सामन्यांसाठी निवड झाली होती. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने या खेळाडूंच्या इंग्लंड दौऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिला आहे.
पीसीबीने दिलेल्या माहितीनुसार, रावळपिंडी मधून उस्मान शेनवारी, इमाद वसीम यांची टेस्ट करण्यात आले. मात्र त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले. कराची, लाहोर आणि पेशावर येथून वकार युनुस, शोएब मलिक आणि क्लिफ डिएकॉन यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. यांचा अहवाल मंगळवारी मिळणार आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सलीम यांनी यापूर्वीच इंग्लंडविरुद्ध ऑगस्टमध्ये होणारा दौरा हा खेळाडूंसाठी धोकादायक असल्याचे सांगितले आहे. पाकिस्तानच्या संघाने इंग्लंड दौऱयासाठी 29 सदस्यीय संघाची निवड केली आहे.