पाकिस्ताननं इंग्लंड विरुद्धच्या रावळपिंडी कसोटीत 9 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. यासह संघानं तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली. विशेष म्हणजे, पहिल्या कसोटीतील पराभवानंतर पाकिस्ताननं हा मालिका विजय मिळवला आहे. संघानं तब्बल 3 वर्षांनंतर घरच्या मैदानावर कसोटी मालिका जिंकली.
या सामन्यात इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात अवघ्या 112 धावांत आटोपला. यानंतर पाकिस्तानला विजयासाठी 36 धावांचं मामूली लक्ष्य मिळालं होतं. पाकिस्ताननं हे लक्ष्य 1 गडी गमावून सहज गाठलं. पाकिस्तानकडून फिरकी गोलंदाज नोमान अलीनं 6 बळी घेतले. तर साजिद खाननं 4 फलंदाजांना बाद केलं. अशाप्रकारे इंग्लंडचे सर्व 10 फलंदाज पाकिस्तानच्या फिरकीपटूंनी बाद केले.
या सामन्यात पाकिस्तानच्या संघानं एक ऐतिहासिक कामगिरी केली. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनी एकही ओव्हर टाकला नाही. पाकिस्ताननं 1952 मध्ये पहिला कसोटी सामना खेळला होता. परंतु आजपर्यंत असं कधीही झालं नव्हतं.
रावळपिंडी कसोटीत पाकिस्तानकडून नोमान अली, साजिद खान, जाहिद महमूद आणि आगा सलमान या फिरकीपटूंनी गोलंदाजी केली. मात्र एकाही वेगवान गोलंदाजाला ओव्हर मिळाला नाही. तसेच, कसोटी इतिहासात केवळ चौथ्यांदा घडलं, जेव्हा पाकिस्तानच्या फिरकीपटूंनी विरोधी संघाच्या सर्व 20 विकेट घेतल्या. या मालिकेतच हे सलग दुसऱ्यांदा घडलं आहे. याआधी मुलतान कसोटीत पाकिस्तानच्या फिरकीपटूंनी इंग्लिश संघाच्या सर्व 20 विकेट घेतल्या होत्या.
फैसलाबादमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानच्या फिरकीपटूंनी विरोधी संघाच्या सर्व 20 फलंदाजांना बाद केलं होतं. यानंतर पाकिस्तानच्या फिरकीपटूंनी 1987 मध्ये इंग्लंडविरुद्ध या कामगिरीची पुनरावृत्ती केली होती. आता पाकिस्तानच्या फिरकीपटूंनी 2024 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत सलग दोन सामन्यांमध्ये हा कारनामा केला.
हेही वाचा –
बाबर आझमला ड्रॉप करताच पाकिस्ताननं जिंकली कसोटी मालिका, इंग्लंडचा दारूण पराभव
रवींद्र जडेजानं रनआऊट करताना दाखवली ‘धोनी’ सारखी हुशारी, कोहलीची प्रतिक्रिया व्हायरल; VIDEO पाहा
टीम इंडियात सर्व काही ठीक नाही का? मोहम्मद शमीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्थान का मिळालं नाही?