न्यूझीलंडचा संघ १८ वर्षांनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानसोबत मर्यादित षटकांची मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानात दाखल झाला आहे. ते पाकिस्तानच्या संघासोबत ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि ५ सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहेत. या मालिकेनंतर पाकिस्तानला इंग्लंडविरुद्धही टी२० मालिका खेळायची आहे. येत्या टी२० विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने या मालिकांचे आयोजन करण्यात आले आहे. तत्पूर्वी सोमवारी (०६ सप्टेंबर) पाकिस्तान संघाचे मुख्य प्रशिक्षक मिसबाह-उल-हक आणि गोलंदाजी प्रशिक्षक वकार यूनिस यांची आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
नुकतेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आगामी टी२० विश्वचषकासाठी १५ सदस्यीय संघ घोषित केला होता. त्याच्या काही तासांनंतरच मिसबाह आणि वकार यांनी हा निर्णय घेतला असल्याने संघाला मोठा धक्का बसला आहे. वर्ष २०१९ मध्ये हे २ दिग्गज संघाच्या प्रशिक्षकपदी रुजू झाले होते. अजून त्यांचा एका वर्षाचा करार बाकी होता. मात्र त्यापूर्वीच या जोडीने राजीनामा देत सर्वांना चकित केले आहे.
त्यांच्याजागी पाकिस्तानचे माजी खेळाडू सकलेन मुश्ताक आणि अब्दुल रजाक न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी पाकिस्तान संघाचे प्रभारी प्रशिक्षक असतील.
Misbah and Waqar step down from coaching roles
More details ➡️ https://t.co/pFjoYQHsKy pic.twitter.com/Ymm6Gak9Rq
— Pakistan Cricket (@TheRealPCB) September 6, 2021
मिसबाह यांनी मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर बोर्डाला आपल्या निर्णयामागचे कारण सांगितले आहे. “मी गेल्या २४ महिन्यांपासून पाकिस्तान संघासोबत आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रिकेट स्पर्धांमध्ये भाग घेतो आहे. यादरम्यान मला सातत्याने बायो बबलमध्ये राहावे लागत आहे. म्हणून मी माझ्या कुटुंबालाही वेळ देऊ शकत नाहीय. मला माहिती आहे की, असे अचानक प्रशिक्षकपदावरुन माघार घेण्याची ही योग्य वेळ नाही. पण पुढील आव्हानांसाठी मी मानसिकरित्या तयार नाही. याच कारणास्तव मी हा निर्णय घेतला आहे,” असे मिसबाह म्हणाले.
“मिसबाह यांनी आपले पद सोडण्याचा निर्णय घेतल्याने आपणही त्यांच्यासोबत आपले पद सोडत असल्याचे,” गोलंदाजी प्रशिक्षक वकार यांनी सांगितले आहे.
विश्वचषकापूर्वी पाकिस्तानचा संघ २५ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर दरम्यान न्यूझीलंडविरुद्ध ५ सामन्यांची टी२० मालिका खेळेल. त्यानंतर १३ ते १४ ऑक्टोबर दरम्यान इंग्लंडविरुद्ध २ सामन्यांची टी२० मालिका खेळेल. या मालिकांनंतर पाकिस्तान त्यांचा टी२० विश्वचषकातील पहिला सामना २४ ऑक्टोबर रोजी भारताविरुद्ध खेळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! टी२० विश्वचषकासाठी पाकिस्तानचा संघ जाहीर, ‘या’ २ खेळाडूंचे पुनरागमन; पाहा संपूर्ण संघ
लढवय्या शिलेदार…! जखमा घेऊन रोहितची शतकी झुंज, पाहा त्याच्या वेदनांची जाण करुन देणारे फोटो
चौथी कसोटी जिंकण्याच्या मार्गावर असलेली ‘विराटसेना’ काळजीत, रोहित-पुजाराच्या दुखापतीवर आली अपडेट