आयसीसी टी२० विश्वचषक २०२६च्या स्पर्धेत ३५वा सामना पाकिस्तान विरुद्ध नामिबिया असा खेळला गेला. कोलंबोच्या सिंहली स्पोर्ट्स क्लब ग्राऊंडवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी केली आणि २० षटकात १९९ धावा केल्या. यावेळी त्यांचा सलामीवीर फलंदाज साहिबजादा फरहानने नाबाद शतकी खेळी केली, मात्र करो वा मरो सामन्यात पाकिस्तानने एका निर्णयावर समालोचक आणि चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केले.
या स्पर्धेच्या सुपर-८मध्ये पोहोचण्यासाठी पाकिस्तानला हा सामना जिंकणे अत्यावश्यक असताना त्यांनी बाबर आझमला फलंदाजीला पाठवलेच नाही. तो ही डगआऊटमध्ये बसून सामना बघतच राहिला. त्यामुळे चाहत्यांनी म्हटले, ‘जर त्याला खेळवायचेच नव्हते तर त्याला अंतिम अकरामध्ये तरी का घेतले.’ या स्पर्धेत बाबरने तीन सामन्यात ६६ धावा केल्या असून तो भारताविरुद्ध ७ चेंडूत ५ धावा करत बाद झाला.
बाबरने स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली, मात्र नामिबियाविरुद्ध त्या क्रमांकावर ख्वाजा नफे फलंदाजीला आला. ख्वाजा ५ चेंडूतच ५ धावा करत बाद झाला. त्यामुळे वाटले आतातरी बाबर येईल, मात्र शादाब खान फलंदाजीला आला. त्याने २२ चेंडूत नाबाद ३६ धावा केल्या. त्याचबरोबर त्याने फरहानसोबत चौथ्या विकेटसाठी ४० चेंडूत ८१ धावांची भागीदारी केली. तसेच बाबरने फलंदाजी न केल्यानेही पाकिस्तानने २०० पर्यंत मजल मारली.
पाकिस्तानसाठी १० वर्षे खेळल्यानंतर कारकिर्दीत पहिल्यांदाच बाबरला पहिल्या डावात फलंदाजी करायला मिळाली नाही. मागील ६८ वेळा, पाकिस्तानचा हा स्टार खेळाडू सामन्याच्या पहिल्या डावात फलंदाजीसाठी उतरला होता.
बाबर नामिबियाविरुद्ध सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला असता तर त्यांची ही त्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची पहिलीच वेळ असती. त्याने पाचव्या क्रमांकावर एकदा फलंदाजी केली आहे. २०१८मध्ये त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या त्या सामन्यात ४१ धावा केल्या होत्या. तो सामना वेलिंग्टनमध्ये खेळला गेला.
बाबरने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १४२ टी२० सामने खेळले. त्यामध्ये त्याने ३ शतके आणि ३९ अर्धशतकांच्या साहाय्याने ४५७१ धावा केल्या आहेत. त्याला मागील वर्षी झालेल्या एशिया कपसाठीही संघातून वगळले होते. नंतर त्याने संघपुनराग केले, मात्र त्याला फलंदाजीत खालच्या क्रमांकावर यावे लागले.






