पाकिस्तान संघाने ८ विकेट्सने यजमान इंग्लंडवर विजय मिळवून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. एकतर्फी झालेल्या या सामन्यात पाकिस्तानने संपूर्ण सामन्यात इंग्लंडला कुठेही डोके वर काढून दिले नाही.
नाणेफेक जिंकून पाकिस्तान संघाने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. दुखापतीमुळे मोहम्मद आमिर या सामन्यात खेळू शकला नाही. पाकिस्तानसाठी हा मोठा धक्का असूनही पाकिस्तानने इंग्लंडच्या फलंदाजांवर पूर्ण वर्चस्व राखले.
सलामीवीर अॅलेक्स हेल्स (१३) धावांवर बाद झाला. त्यानंतर बेअरस्टो (४३) आणि जो रूट (४६) यांनी केलेल्या चिवट फलंदाजीच्या जोरावर २८ व्या षटकात इंग्लंडने २ बाद १२८ अशी मजल मारली होती. पण रूट (४६) आणि मॉर्गन (३३) धावांवर बाद झाल्यानंतर इंग्लंडचा डाव कोलमडला.
सलामीच्या फलंदाजांनी निराशा केल्याने इंग्लडच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी संथ फलंदाजी करणे पसंद केले. अष्टपैलू बेन स्टोक्सही पाकिस्तानी माऱ्याचा सामना करताना अडखळत होता परंतु तरीही त्याने एका बाजूने भक्कम किल्ला लढवला.अखेर शेवटच्या षटकांमध्ये फटकेबाजी करण्याच्या नादात त ३४ धावांवर बाद झाला. पाकिस्तानकडून हसन अलीने तीन, जुनैद खान आणि रुमान रईसने प्रत्येकी दोन आणि शादाब खानने एक गडी बाद केला. तर इंग्लंडचे दोन फलंदाज धावचीत झाले.
२१२ धावांच लक्ष ठेवून मैदानात आलेल्या पाकिस्तान संघाला अझहर अली आणि फाखरी झमान यांनी जबदस्त सुरुवात करून दिली. ११८ धावांची सलामीला भागीदारी झाल्यावर फाखरी झमान ५७ धावांवर राशिदच्या गोलंदाजीवर बटलरकडून स्टॅम्पिंग झाला. तर अझहर अलीला ७६ धावांवर बॉलने त्रिफळाचित केले. त्यानंतर बाबर आणि हाफीज यांनी जास्त पडझड होऊ न देता ३८व्या षटकात पाकिस्तानच्या विजयावर शिक्कमोर्तब केले.
१० षटकात ३५ धावा देऊन ३ बळी घेणाऱ्या हसन अलीला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.