बुधवारी (२७ ऑक्टोबर) जाहीर झालेल्या आयसीसी पुरुषांच्या टी-२० क्रमवारीमध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाचा सलामीवीर मोहम्मद रिजवानला मोठा फायदा झाला आहे. रिजवानने या क्रमवारीमध्ये चौथ्या क्रमांकावर मजल मारली आहे. रिजवानच्या टी-२० कारकिर्दीत तो यापूर्वी कधीच क्रमवारीमध्ये चौथ्या स्थानापर्यंत पोहचू शकला नव्हता.
टी-२० विश्वचषकात भारत आणि न्यूझीलंड संघाविरुद्ध केलेल्या जबदरदस्त खेळीच्या जोरावर तो या स्थानावर पोहचू शकला आहे. त्याने भारताविरुद्ध नाबाद ७९ आणि न्यूझीलंडविरुद्ध ३३ धावांची विजयी खेळी केली होती. रिजवानने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला मागे टाकून हे चौथे स्थान मिळवले आहे.
टी-२० विश्वचषकातील त्याच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध भारतीय कर्णधार विराट कोहलीने जबरदस्त अर्धशतकी खेळी केली होती. असे असले तरी, बुधवारी त्याला आयसीसी टी-२० क्रमवारीमध्ये नुकसान झाले आहे.
विराट फलंदाजांच्या यादीत एका स्थानाने खाली घसरला आहे. विराट यापूर्वी चौथ्या स्थानावर होता, आता तो पाचव्या स्थानावर घसरला आहे. पाकिस्तानच्या मोहम्मद रिजवानने केलेल्या उत्कृष्ट खेळीमुळे विराट एका स्थानाने खाली सरकला आहे आणि रिजवानने त्याची जागा घेतली आहे. तसेच भारतीय संघाचा सलामीवीर केएल राहुल या टी-२० क्रमवारीमध्ये दोन स्थानांनी खाली सरकला आहे. केएल राहुल आता आठव्या स्थानावर आहे.
याव्यतिरिक्त दक्षिण अफ्रिका संघाच फलंदाज ऐडन मार्करामने टी-२० क्रमवारीमध्ये मोठी झेप घेतली आहे. त्याला बुधवारी जाहीर झालेल्या क्रमवारीमध्ये ८ स्थानांचा फायदा झाला आहे. यानंतर मार्कराम तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. टी-२० विश्वचषकात मार्करामने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४० आणि वेस्ट इंडीजविरुद्ध ५१ धावांची खेळी केली होती आणि याच्याच जोरावर त्याने ही मजल मारली आहे.
मार्करामने त्याच्या टी-२० कारकिर्दीतील सर्वश्रेष्ठ स्थान मिळवले आहे. तो सध्या फलंदाजांच्या यादीत इंग्लंडच्या डेविड मलान आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमच्या मागे आहे.
तसेच बांगलादेशचा अष्टपैलू शाकिब अल हसन आयसीसी टी-२० अष्टपैलूंच्या क्रमवारीमध्ये सर्वोच्च स्थानावर पोहोचला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“द्रविडने प्रशिक्षकपदासाठी अर्ज केल्यानंतर दुसऱ्या कोणी अर्ज करण्याची गरज नाही”
आपल्या खराब फॉर्मविषयी वॉर्नरने दिली प्रतिक्रिया; ‘असा’ करतोय सराव