मुंबई । पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून तिथे पोहचताच त्यांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले. दरम्यान, पाकिस्तानचा माजी दिग्गज गोलंदाज वकार युनिसने 1996 साली झालेल्या विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्यातील आठवणी सांगितल्या. या सामन्यातील निकालापेक्षा आमीर सोहेल आणि वेंकटेश प्रसाद यांच्यात रंगलेल्या शाब्दिकयुद्धामुळे हा सामना जास्त लक्षात ठेवला जातो.
1996 साली बंगळूर येथे भारत-पाक सामना खेळवण्यात आला होता. यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 287 धावांचा डोंगर रचला. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ 242 धावांवर सर्वबाद झाला. पाकिस्तान संघाचा 39 धावांनी पराभव झाला.
या सामन्यात आमीर सोहेल आणि वेंकटेश प्रसाद यांच्यात चांगले शाब्दिक युद्ध रंगले होते. 288 धावांचे विजयी लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या पाकिस्तानने दमदार सुरुवात करत 14 षटकात 1 बाद 109 धावा केल्या होत्या. आमीर सोहेल चांगली फलंदाजी करत होता.
याच दरम्यान आमिरने चौदाव्या शतकात वेंकटेश प्रसादच्या चेंडूवर कव्हरवर चौकार मारला आणि त्यानंतर या भारतीय गोलंदाजाला बॅटने बाउंड्रीच्या दिशेने इशारा करत होता. त्यानंतर पुढच्या चेंडूत वेंकटेश प्रसादने आमीर सोहाच्या यष्ट्या गुल केल्या आणि त्याला पॅवेलियनचा रस्ता दाखवला.
याच घटनेविषयी वकार युनिस बोलताना म्हणाला की,”मी प्रामाणिकपणे सांगतो की, आमीर सोहेलचे वर्तन पाहून आम्ही देखील हैराण झालो होतो. तो चांगल्या लयीत फलंदाजी करत होता, त्याला असं करण्याची गरज नव्हती. मला वाटते तो दबावामध्ये आला असावा.”
“तो खरोखरच चांगली फलंदाजी करत होता. मला वाटतं कमी चेंडू खेळून त्याने 55 धावा केल्या होत्या. सईद अन्वर देखील चांगल्या फॉर्मात होता. दोघांनीही सलामीला दमदार सुरुवात करून देत पहिल्या दहा षटकात 85 धावा केल्या होत्या. दरम्यान आम्ही अन्वर आणि सोहेलची विकेट गमावली आणि मॅचचा नूर पलटला,” असे वकार युनिसने सांगितले.