बऱ्याचदा क्रिकेटच्या मैदानावर छोटेमोठे अपघात घडताना दिसत असतात. त्यातही अधिकतर वेगवान गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे हे प्रसंग उद्भवत असतात. बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान यांच्यात चट्टोग्राम येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातही असाच काहीसा प्रकार घडला. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदी याच्यामुळे आपला पदार्पणाचा आंतरराष्ट्रीय सामना खेळत असलेल्या बांगलादेशचा क्रिकेटपटू यासिर अली याला गंभीर दुखापत झाली आहे.
बांगलादेशच्या दुसऱ्या डावातील ३० व्या षटकादरम्यान हा प्रसंग घडला. या षटकातील शाहिनच्या एका बाऊंसरला सोडण्याच्या प्रयत्नात यासिरला ही दुखापत झाली. त्याने थोड्या वेळासाठी त्या चेंडूवरुन आपली नजर हटवली होती. त्याची हीच चूक त्याला भलतीच महागात पडली आणि चेंडू जाऊन सरळ त्याच्या हेल्मेटला धडकला.
या प्रसंगानंतर थोडा वेळ सामना थांबवण्यात आला होता. नंतर बांगलादेश संघाचे फिजिओ मैदानावर आले आणि त्यांनी यासिरच्या जखमेची तपासणी केली व यासिरने पुन्हा फलंदाजी सुरू केली. परंतु एक षटक खेळल्यानंतर ड्रिंक्स ब्रेक देण्यात आला. यादरम्यान यासिरने वेदना होत असल्याची तक्रार केल्याने पुन्हा एकदा बांगलादेशचे फिजिओ मैदानावर आले आणि त्यांनी यासिरची दुखापत तपासली. अखेर यानंतर त्याला रिटायर्ड हर्ट घोषित करत मैदानाबाहेर नेण्यात आले.
Bangladesh's Yasir Ali walked off the field retired hurt a couple of overs after a Shaheen Shah Afridi bouncer hit him flush on the helmet.
📸: Getty Images pic.twitter.com/ayUuuq2tT6
— Grassroots Cricket (@grassrootscric) November 29, 2021
पुढे यासिरला चट्टोग्रामच्या एका स्थानिय रुग्णालयात भरती करण्यात आले, जिथे त्याच्या दुखापतीचे सीटी स्कॅन करण्यात येईल. आपला पदार्पणाचा कसोटी सामना खेळत असलेल्या यासिरने रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर पडण्यापूर्वी ६ चौकारांच्या ३६ धावा केल्या होत्या.
पदार्पणाच्या कसोटीतून बाहेर
या घटनेच्या काही वेळानंतर बांगलादेशच्या संघ व्यवस्थापनाने यासिर पहिल्या कसोटीतून बाहेर झाल्याची घोषणा केली. आता त्याचा कन्कशन सब्सिट्यूट म्हणून नुरुल हसनला संघासोबत जोडले गेले आहे. नियमांनुसार, नुरुल हसन या सामन्यात केवळ फलंदाजी करू शकणार आहे.
बांगलादेशने कन्कशन सब्सिट्यूट वापरण्याची तिसरी वेळ
लक्षवेधी बाब अशी की, ही तिसरी वेळ आहे जेव्हा बांगलादेश संघाला कोणत्या सामन्यात कन्कशन सब्सिट्यूट वापरण्याची गरज पडली आहे. सर्वप्रथम भारतीय संघाविरुद्ध २०१९ मध्ये कोलकाता कसोटी खेळताना बांगलादेशने कन्कशन सब्सिट्यूटचा वापर केला होता. त्यावेळी लिटन दास आणि नईम हसन यांच्या डोक्यावर चेंडू लागला होता. याचवर्षी श्रीलंकेविरुद्धच्या एका वनडे सामन्यात त्यांचा मोहम्मद सैफुद्दीनला दुखापत झाल्याने सब्सिट्यूट खेळाडूला मैदानावर उतरवावे लागले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
पदार्पणाच्या कसोटीत श्रेयस अय्यरला मदतगार ठरला कोच द्रविडचा ‘हा’ मोलाचा सल्ला