नुकत्याच झालेल्या एका भीषण घटनेत पाकिस्तानने अफगाणिस्तानची राजधानी काबुलमधील एका रुग्णालयावर एअरस्ट्राइक (हवाई हल्ला) केला. या हल्ल्यात सुमारे 400 लोकांचा मृत्यू झाला असून 250 जण जखमी झाले आहेत. धक्कादायक म्हणजे, गरिबांच्या उपचारासाठी असलेले 2000 बेडचे भव्य रुग्णालय या हल्ल्यात पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण अफगाणिस्तान हादरले आहे. अफगाणिस्तानचा युवा फिरकीपटू अल्लाह गजनफरने या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
‘सीएनएन न्यूज 18’ शी बोलताना तो म्हणाला, तिथे लोकांकडे उपचारासाठी पैसे नाहीत, अशा परिस्थितीत रुग्णालयाला लक्ष्य करणे अत्यंत क्लेशदायक आहे. निष्पाप नागरिकांना मारणे कोणत्याही प्रकारे योग्य नाही आणि अफगाणिस्तानचे नागरिक हे सहन करणार नाहीत. गजनफरने संताप व्यक्त करत पाकिस्तानला इशारा दिला की, अफगाणिस्तानचा इतिहास सर्वांना माहित आहे. जर इतिहासाची पुनरावृत्ती झाली, तर त्याचे परिणाम पाकिस्तानसाठी खूप वाईट असतील.
भारताला अफगाणिस्तानचा जवळचा मित्र मानत गजनफरने मदतीचे आवाहन केले आहे. तो म्हणाला, भारत आमचा खूप जवळचा मित्र आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी आपण एकत्र बसून चर्चा केली पाहिजे. आम्ही इतर देशांनाही मदतीची विनंती करतो. सध्या जग आधीच अनेक संकटांचा सामना करत आहे, अशा काळात हे कोणासाठीही हिताचे नाही.






